Newsworldmarathi Mumbai :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन हालचाली घडत आहेत. ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक—विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, आणि प्राची आल्हाट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाची ही घटना मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली.
या प्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
ही घटना शिवसेना उ.बा.ठा. पक्षासाठी मोठा धक्का मानली जात आहे, कारण या नगरसेवकांनी थेट भाजपा पक्षात प्रवेश करत, त्यांच्या स्थानिक स्तरावरील राजकीय भूमिकेवर महत्त्वाचा प्रभाव टाकला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय समीकरणे बदलू शकतात.