LATEST ARTICLES
सायारा चित्रपटाची जोरदार एण्ट्री
Newsworldmarathi Mumbai: मोठ्या अपेक्षांनिशी प्रदर्शित होत असलेल्या सायारा या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अहान पांड्य आणि नवोदित अभिनेत्री अनीत पड्डा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा १८ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली असून, प्री-बुकिंगमध्ये मोठी उसळी पाहायला मिळते आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘सायारा’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी सुमारे २४ कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज आहे.
🎬 मोठ्या पडद्यावर प्रेम, सस्पेन्स आणि संगीताची तिहेरी मेजवानी
‘आशिकी २’ आणि ‘एक विलन’ यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सायाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोमँटिक थ्रिलरमध्ये आपला ठसा उमटवला आहे. चित्रपटातील गाणी विशेष गाजत असून, यूट्यूबवर रिलीज झालेल्या “तू सायारा, मी दिवाना…” या टायटल साँगला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
🎟 प्री-बुकिंग जोरात
• प्रीमियम मल्टिप्लेक्समध्ये सायारासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग
• विशेषतः पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू येथे शो ‘हाऊसफुल’
• तरुण प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ
🗣️ सिनेमा समीक्षक काय म्हणतात?
चित्रपट ट्रेलर, संगीत आणि स्टारकास्ट यांमुळे सायाराबद्दल उत्सुकता वाढली आहे. अहान पांड्य याची हे पदार्पण असूनही त्याच्या अभिनयाची चर्चा जोरात आहे. अनीत पड्डानेही आपल्या पहिल्याच चित्रपटात प्रभाव टाकला असल्याचं समीक्षकांचं मत आहे.
🎥 चित्रपटाची माहिती एका झटक्यात
• दिग्दर्शक : मोहित सूरी
• प्रमुख कलाकार : अहान पांड्य, अनीत पड्डा
• संगीत : मिथुन, अंकित तिवारी
• प्रकार : रोमँटिक थ्रिलर
• रिलीज तारीख : १८ जुलै २०२५
प्रकाश जगताप यांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड
Newsworldmarathi Pune: हवेली तालुक्यातील राजकारणात जेष्ठ नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रकाश चंद्रकांत जगताप यांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका घेणाऱ्या प्रकाश जगताप यांना ही जबाबदारी मिळाल्याने कृषी बाजार समितीच्या कामकाजात अनुभव आणि दिशा यांचा समन्वय साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीनंतर जगताप यांनी “शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक व कार्यक्षम कारभार राबविण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी प्रतिक्रिया दिली.
हवेली तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेली अनेक दशके सक्रिय असलेले प्रकाश जगताप हे संयमी नेतृत्व, प्रशासनातील अनुभव आणि शेतकऱ्यांशी असलेली जवळीक यासाठी ओळखले जातात. त्यामुळे ही निवड स्वागतार्ह असून बाजार समितीच्या कामकाजास नवसंजीवनी मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
सभापती पदासाठी अन्य कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एक महत्त्वाची संस्था असून तिच्या माध्यमातून हजारो शेतकरी व व्यापाऱ्यांचे व्यवहार रोजच्या रोज होत असतात. अशा संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी आता प्रकाश जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे
बॅंकेतच केली मॅनेजरने आत्महत्या; बारामतीच्या बॅंक ऑफ बडोदामधील धक्कादायक प्रकार
Newsworldmarathi Pune: बॅंक ऑफ बडोदाच्या बारामती शाखेचे व्यवस्थापक शिवशंकर मित्रा (वय ५२, मूळ रा. रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश, सध्या रा. बारामती ) यांनी मध्यरात्री बॅंकेतच गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मित्रा यांन पाच दिवसांपूर्वीच बॅंकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाढत्या तणावातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
चिठ्ठीमध्ये त्यांनी मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बॅंक ऑफ बडोदा, बारामती. मी आज बॅंकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहेत. माझी बॅंकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱयांवर अतिरिक्त दबाव टाकू नका, सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात. मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वच्छेने करत आहे. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये, फक्त बॅंकेच्या प्रचंड दबावामुळे मी जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
पत्नी व मुलगी यांना उद्देशून त्यांनी, प्रिया मला माफ कर, माही मला माफ कर असे लिहिले आहे. शक्य झाल्यास माझे नेत्रदान करावे अशी इच्छा चिठ्ठीत व्यक्त केली आहे. या चिठ्ठीतील मजकूर नेमका त्यांनीच लिहिला आहे का, वरिष्ठांकडून त्यांना काही त्रास होता का, यासंबधी आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.
लंडनमध्ये वंजारी समाजाचा पाचवा मेळावा उत्साहात संपन्न; विठ्ठल मंदिरासाठी MIT कडून ५० लाखांचे दान
Newsworldmarathi Team: यूकेमध्ये वास्तव्यास असलेल्या वंजारी समाजाचा पाचवा सामूहिक मेळावा लंडनमध्ये उत्साहात पार पडला. समाजातील एकतेचा, सांस्कृतिक जिव्हाळ्याचा आणि बंधुत्वाचा भक्कम परिचय देणारा हा सोहळा अनेक दृष्टीने लक्षवेधी ठरला.
या मेळाव्याला MIT चे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि यूकेमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणारे माऊली श्री अनिल खेडकर विशेष उपस्थित होते.
मेळाव्याचे आयोजन खेडकर कुटुंबीय, श्री रुस्तम खेडकर आणि वंजारी समाजातील सर्व सदस्यांच्या पुढाकारातून पार पडले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, सजावट, सेवा आणि व्यवस्थापन संघटीत स्वयंसेवक टीमने अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.
श्री नाना नागरगोजे, श्री वैभव आव्हाड आणि श्री प्रवीण सानप यांच्या अथक मेहनतीमुळे व प्रेमळ पाहुणचारामुळे संपूर्ण मेळावा अविस्मरणीय ठरला. या निमित्ताने युनायटेड किंगडममधील मराठी व वंजारी बांधवांमध्ये स्नेह, आपुलकी आणि एकतेचे दृढ बंध निर्माण झाले.
या कार्यक्रमात डॉ. राहुल कराड यांनी ‘MIT’ च्या वतीने विठ्ठल मंदिराच्या उभारणीसाठी ५० लाख रुपयांची रक्कम भक्तिभावाने दान दिली.“पंढरपूरच्या विठ्ठलाचे तेज आता संपूर्ण जगभर पसरत आहे,” अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
वंजारी सेवा संघाच्या वतीने आयोजक व सर्व स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन
लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते.
डॉ. दीपक टिळक यांचा परिचय
डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. दीपक टिळक यांना अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai: विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानभवन येथे राज्याच्या सुधारित युवा धोरणासाठी गठित समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत भारतीय, राष्ट्रीय युवा पुरस्कार सन्मानर्थी प्रा. डॉ. मिलिंद भोई, शंतनू जगदाळे, तपस्वी गोंधळी, मनीष गवई, विशेष निमंत्रित सदस्य अश्विनी एकबोटे, आमदार संतोष दानवे, राजेश पवार, आशुतोष काळे, प्रवीण दटके, देवेंद्र कोठे, सुहास कांदे, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रकाश सुर्वे, वरुण सरदेसाई, रोहित पाटील, युवा बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उपस्थित होते. विधान भवन मुंबई येथे ही बैठक संपन्न झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युवकांचे विचार, त्यांच्या अपेक्षा समजून घेत धोरण आखले गेले तर ते समर्पक ठरेल. शहरी व ग्रामीण भागातील युवकांना समान संधी मिळावी यासाठी प्रशिक्षण, सुविधा आणि योजनांचा समावेश असलेले समतोल धोरण तयार करणे आवश्यक आहे. युवक कल्याण विभागाबरोबरच अन्य विभागांनीही हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, सोशल मीडिया आणि सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनाही धोरणात सहभागी करून त्यांच्या सूचना समाविष्ट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिले.
बैठकीत आमदार आणि निमंत्रित सदस्यांनीही सूचना मांडत समृद्ध धोरणासाठी योगदान दिले.या समितीतील तज्ञ सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई, डॉ. शंतनू जगदाळे, श्री प्रवीण निकम यांनी युवा धोरणामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टींचा कच्चा मसुदा यावेळी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केला.
शारीरिक मानसिक व भावनिक दृष्ट्या सक्षम असणारा युवक हा या युवा धोरणाचा पाया आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी केले.
शिक्षण, रोजगार, राष्ट्रप्रेमाला प्राधान्य
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या गरजा ओळखून, देश-विदेशातील युवकांबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून, प्रत्यक्ष संवादातून उपाययोजना आखल्या जातील.
नवे सुधारित युवा धोरण यामध्ये शिक्षण, रोजगार, उद्योजकता, बौद्धिक व सामाजिक विकास, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) याबरोबरच जबाबदारीची जाणीव, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण रुजवणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील योजना, युवा प्रशिक्षण केंद्र, युवा पुरस्कार, वसतीगृहे, महोत्सव, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, युवा निधी आणि युवा प्रतिष्ठा निर्देशांक आदी बाबींचा समावेश केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पुणेकरांसाठी मध्यवर्ती भागात खासदार जनसंपर्क कार्यालय राहणार २४ तास खुले
Newsworldmarathi pune: पुणेकरांनी आपले प्रतिनिधी म्हणून मुरलीधर मोहोळ यांना राजधानी दिल्लीत पाठवून एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहिल्याचवेळी त्यांना सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रायलाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. मंत्री म्हणून काम करतानाही खासदार मोहोळ यांनी विधानसभानिहाय जनता दरबाराव्दारे पुणेकरांशी संवाद ठेवला. पुणेकरांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्याशी कायम संवाद राखण्यासाठी आता शहराच्या मध्यवर्ती भागात २४ तास खुले असणारे खासदार जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या या कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज शनिवारी ( दि.१२) होणार आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन होणार आहे. जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण दुपारी ३ः३० वाजता तर अहवाल प्रकाशन कार्यक्रम दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. पुणेकरांच्या समस्या, अडी-अडचणी राज्यमंत्री मोहोळ यांच्यापर्यंत पोचाव्यात या हेतूने हे कार्यालय २४ तास खुले असणारे आहे. पुणेकरांच्या आणि नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेच्या योजनांची महिती मिळेल आणि लाभ घेण्यासाठीचीही प्रक्रिया केली जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या विविध लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि ओळखपत्र मिळवण्याची सुविधा, या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याचा महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यासाठीच्या दीर्घकालीन हिताच्या योजनांची आखणी व पायाभरणी केली. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारने अभूतपूर्व मदत केली. आता मंत्रिपदामुळे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करण्यासाठी योगदान देता येत आहेत. या बरोबरच विकसित पुण्याच्या दिशेनेही ठोस पावले टाकायला सुरूवात केली आहे. या सर्व वाटचालीत पुणेकरांची भक्कम साथ आवश्यक आहे. त्यासाठीच जनसंपर्क कार्यालय सुरू होत आहे’.
कोंढवा-येवलेवाडीत रात्रपाळीत साफसफाई
Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडून हद्दीत रात्रपाळीत साफसफाई, स्वच्छताविषयक कामकाज सुरू करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या पुढाकाराने कोठीनिहाय सेवकांना स्वच्छतेबाबत आणि सुरक्षतेबाबत मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
या वेळी आरोग्यनिरीक्षक अभिजित सूर्यवंशी, प्रशांत कर्णे, साहिल धोत्रे आणि कोठीकडील मुकादम, रात्रपाळीतील सेवक उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ चारचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सर्वच साफसफाई कर्मचाऱ्यांकडून हे काम हाती घेतले आहे.
पुण्यात नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू; अंधश्रद्धेचा संशय
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, नवरा-बायकोच्या भांडणात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही दुर्दैवी घटना केडगाव गावात घडली असून, अवधूत मेंगवडे असं मृत बालकाचं नाव आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे आपल्या कुटुंबासह केडगाव येथे वास्तव्यास आहेत. किरकोळ कारणावरून त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे भांडण सुरू झाले. भांडणाचा राग आला असताना पत्नीने नवऱ्यावर हल्ला करण्यासाठी त्रिशूल उचलले. मात्र, तो त्रिशूल चुकून बाजूला असलेल्या भावजयेच्या कडेला लागला आणि तिथेच असलेल्या ११ महिन्यांच्या अवधूतच्या पोटात घुसला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्पाप पुतण्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ही घटना अंधश्रद्धेमुळे घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भांडणाच्या प्रसंगी त्रिशूलचा वापर आणि त्यामागील हेतू याची चौकशी सुरु असून, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार; खलिस्तानी हात असल्याचा संशय
Newsworldmarathi Team: प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माने नुकतेच कॅनडामधील ब्रॅम्पटन शहरात ‘Kap’s Café’ सुरू केले होते. आपल्या पत्नी गिन्नी चतरथ हिच्यासह मोठ्या थाटात या कॅफेचे उद्घाटनही करण्यात आले होते. उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडीओ कपिलने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.
मात्र, या नव्या उपक्रमाला काही काळानंतर मोठा धक्का बसला आहे. ‘Kap’s Café’वर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी कॅफेवर तब्बल १० ते १२ गोळ्या झाडल्या असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कॅफेच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून या घटनेनंतर काही स्टोरीज शेअर करण्यात आल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर जे लोक मेसेज किंवा डायरेक्ट मेसेज (DM)द्वारे पाठिंबा देत आहेत, अशा सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच, वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या कॅनडा पोलिसांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
या हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, कॅनडातील सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कपिल शर्माच्या कॅफेवर हल्ला झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.