Newsworldmarathi Nagpur महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ( देवाभाऊ) च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी चार वाजता नागपूर या ठिकाणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यानंतर मुंबईच्या ऐवजी आता शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर या ठिकाणी पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे. दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे.