Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुक्रवारी रात्री सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळील आंदरूड गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान मारहाण झाली. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमादरम्यान निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घेण्यासाठी कुस्ती अखाड्यात गेला. यावेळी उपस्थित असलेला सागर मोहोळकर नावाचा पैलवान अचानक घायवळवर धावून गेला आणि त्याला मारहाण केली. सागर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो पेशाने पैलवान आहे.
घटनेनंतर सागर मोहोळकरने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
“बॉस” या टोपणनावाने ओळखला जाणारा निलेश बन्सीलाल घायवळ हा पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो. २००० ते २००३ या कालावधीत पुण्यात त्याचा गुन्हेगारीत दबदबा होता. निलेश घायवळ हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव गावचा रहिवासी असून शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर त्याचा गुन्हेगारीकडे ओढा वाढला.
पुण्यात आल्यावर त्याने कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या टोळीत सक्रिय सहभाग घेतला. त्याच काळात एका खून प्रकरणात त्याचा सहभाग सिद्ध झाला आणि त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परत आल्यावरही त्याची गुन्हेगारी कारकीर्द थांबली नाही. त्याच्यावर खून, जबरदस्ती वसुली, दहशत निर्माण करणे, धमक्या देणे अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सध्या निलेश घायवळ स्वतःची टोळी चालवत असल्याची माहिती असून पुण्यात त्याच्या नावाची दहशत अजूनही काही भागांत जाणवते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील आंदरूड गावातील कुस्ती स्पर्धेदरम्यान त्याला सागर मोहोळकर या पैलवानाने भर कार्यक्रमात मारहाण केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुण्याचा अंडरवर्ल्ड संघर्ष: मारणे विरुद्ध घायवळ टोळीयुद्ध
पुणे शहराने गेल्या काही दशकांत अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय आणि अस्त पाहिला आहे, पण त्यात सर्वाधिक गाजलेला संघर्ष म्हणजे गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन कुख्यात गुंडांमधील रक्तरंजित टोळीयुद्ध.
निलेश घायवळने शिक्षेवरून सुटल्यानंतर गजानन मारणेची साथ सोडून स्वतःची टोळी स्थापन केली. त्यानंतर पुण्यात या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी थेट संघर्ष सुरु झाला. या वादाला भीषण वळण तेव्हा मिळालं, जेव्हा घायवळ टोळीतील सदस्य पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केल्याचं समोर आलं.
या घटनेनंतर, २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी मारणे टोळीवर गोळीबार केला, ज्यात सचिन कुडलेचा जागीच मृत्यू झाला. या खुनानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये तुफान संघर्ष पेटला आणि शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
या टोळीयुद्धामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. दोन्ही गट एकमेकांच्या सदस्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करत होते. या संघर्षाचा काळ पुण्यातील गुन्हेगारी इतिहासात ‘रक्तरंजित पर्व’ म्हणून ओळखला जातो.
गुन्हेगारी विश्वातील मोठं नाव – निलेश घायवळवर तब्बल 10+ गंभीर गुन्हे
पुणे शहरासह आसपासच्या भागात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून खालीलप्रमाणे त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा इतिहास समोर आला आहे:
– खून
– जीवे मारण्याचा प्रयत्न
– खंडणी वसुली
– दरोडा
– गर्दी जमवून दंगा करणे
– गंभीर दुखापत करणे
– मारहाण
– अपहरण व खंडणी
– भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल प्रकरण
या सर्व गुन्ह्यांमुळे निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या “वॉच लिस्ट”मध्ये असून त्याच्या हालचालींवर सातत्यानं नजर ठेवली जाते. त्याचे अनेक साथीदार पुणे, सोलापूर आणि अहमदनगर परिसरात सक्रिय असल्याचं समजतं. मध्यंतरी त्याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यामुळे तो पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता.


Recent Comments