Newsworldmarathi Pune: उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 ते शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 19 वी राष्ट्रीय जांबोरी आणि ग्रँड फिनाले डायमंड ज्युबली झाली. यामध्ये पुणे येथील रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील राणी लक्ष्मीबाई गाईड पथकातील 06 गाईडने उत्कृष्ट कामगिरी केली.
स्काऊट गाईड जांबोरीसाठी संपूर्ण देशभरातून 28 राज्य तसेच चार देशातील 35 हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 80 स्काऊट्स व 80 गाईड्स यांची निवड करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या हस्ते जांबोरीचा उद्घाटन समारंभ झाला, तर शेकोटी कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री योगेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जांबो रीस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मुख्य उपस्थितीत जांबोरीचा समारोप समारंभ पार पडला.
स्काऊट गाईड संचलन, शोभायात्रा, लोकनृत्य, साहसी खेळ, विविध स्पर्धा, फूड प्रदर्शन किलोरामा,कॅम्प क्राफ्ट, पायोनिरिंग प्रोजेक्ट, नाईट हाईक,साईड सिन अशा अनेक गोष्टीत विद्यालयातील गाईडने सहभाग नोंदवत विद्यालय,पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्याची शान उंचावली. शेकोटी कार्यक्रमातील लोकनृत्यात विद्यार्थ्यांनी महाराजांच्या महाराष्ट्राचे दर्शन घडवून आणले.
जांबोरीमध्ये विद्यालयातील इयत्ता नववी मधील पौर्णिमा मनोज सर्वगोड,अदिती तानाजी तुळसे,काजल रविकिरण उके, श्रावणी प्रवीण कांबळे, नेहा मनोज कांबळे, अक्षदा प्रकाश चौधरी या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला.सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला दहावी बोर्ड परीक्षेत 10 वाढीव गुण मिळणार आहेत. गाईडर सोनल सुतार यांनी विद्यार्थिनींना जांबोरी सहभागासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय जांबोरीतील विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर,विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे तसेच सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन करणारे विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर, पालक व दाते यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.


Recent Comments