Newsworldmarathi Mumbai : मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक यासाठी तयार आहेत, अशी समाजमाध्यमावर पोस्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला पुन्हा एकदा साद घातली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची जोरात सुरू झालेली चर्चा ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्यामुळे काहीशी थंडावलेली दिसत होती. मात्र, ही पोस्ट करत शिवसेनेने (ठाकरे) पुन्हा एकदा हवा भरल्याचे दिसत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या समाजमाध्यमावरील अधिकृत अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फोटोसह शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार शिवसैनिकांचा (ठाकरे) असल्याचे सांगणाऱ्या या पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीसाठी निमंत्रण दिले असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. असे असले तरी एकत्र येण्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यातील भांडण आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. ते बाजूला ठेवून एकत्र राहणे ही फार काही कठीण गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही. परंतु हा विषय माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील तत्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज ठाकरे यांचा प्रस्ताव स्वीकारताना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास सहमती दर्शवली होती. माझे कधीही मतभेद नव्हते. तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवत एकत्र येण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होत. त्यानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Recent Comments