Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिरवणे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शरीरसंबंधासाठी १२ वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेपत्ता मुलीचा मृतदेह गुरुवारी उशिरा एमआयडीसीतील डोंगराळ भागात सापडला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक अल्पवयीन मुलगी शिरवणे एमआयडीसीतील एकाच भागात राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांची चांगली ओळख होती. अल्पवयीन मुलाने डोंगराळ भागात मुलीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर झालेल्या भांडणात मुलाने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
त्यानंतर त्याने मुलीचा मोबाईल सोबत घेऊन त्या ठिकाणावरून पळ काढला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीवरून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला होता. या शोधमोहिमेदरम्यान रात्री मोबाईल परत देण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अल्पवयीन मुलाने हत्या केलेल्या मुलीचा मोबाईल रस्त्यावर भेटल्याचे सांगून तिच्या कुटुंबीयांना रात्री आणून दिला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मुलीच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. या तपासात मुलगा खोटी माहिती देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
Recent Comments