Newsworldmarathi Mumbai: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. या नेत्यांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
के.सी. कॉलेज येथील सभागृहात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास पाटील, देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, महिला आघाडीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, धुळ्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करण्याचे आणि सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा करण्याचे आवाहन पवार यांनी केले.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या दुफळीत पाटील व देवकर यांनी शरद पवार यांना साथ दिली होती. तसेच विधानसभा निवडणुकीत सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारकडून एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागते की काय,अशी परिस्थिती असल्याने अनेक कार्यकर्त्यांना आपण सत्ताधारी पक्षात असायला हवे, अशी भावना प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.


Recent Comments