Newsworldmarathi Mumbai: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.
पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्षेत्राला जेवढे जास्तीत जास्त पाठबळ देऊ तेवढ्या जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती करु शकू, स्थानिक समुदायाला अधिकारिता देऊ शक, असंही देवेंद्र फडणीस यावेळी म्हणाले. महाबळेश्वर (जि. सातारा) येथे ‘महापर्यटन उत्सव – सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असून आगामी 5 वर्षामध्ये आपल्याला राज्याला पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळणे आणि परिसरामध्ये पर्यटन संस्कृती रुजणे महत्त्वाचे असते. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना संबंधित स्थळांचा, परिसराचा, प्रदेशाचा स्थानिक अनुभव प्राप्त होणे महत्त्वाचे असते. यासाठी पर्यटन विभागाने संपूर्ण वर्षभराचे महोत्सवाचे कॅलेंडर तयार केले पाहिजे. या कॅलेंडरनुसार पर्यटनाचे आयोजन करण्याच्या उद्देशाने सर्वच पर्यटन यात्रा आयोजक करणाऱ्यांसोबत वार्षिक परिषदेचे आयोजन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, अलीकडच्या काळात लोक सर्व प्रकारची बुकिंग, प्लॅनिंग ऑनलाईन करतात. त्यामुळे आपले पोर्टल, वेबसाईट इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट आणि एआयचा वापर करुन व्यवस्था उभी केली पाहिजे. पर्यटकांना राज्यातील पर्यटनासाठी पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजे. असे केल्यास राज्याच्या पर्यटन क्षेत्राची गाडी सुसाट धावू शकेल, असे सांगत महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असून न्यू महाबळेश्वरच्या निर्मितीद्वारे नवीन संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई येथे आयोजित वेव्ह्ज 2025 मुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीते यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट तयार झाले आहे. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांना या सर्वांचा अनुभव करुन देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील, यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल व पर्यटन संस्कृती उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


Recent Comments