Newsworldmarathi Beed: बीडमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. बीडमध्ये गुंडाराज सुरूच आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या ज्या पवनचक्कीच्या वादावरून झाली होती, त्यावरूनच पुन्हा एकदा राडा झाला आहे. पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडूनच गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्की प्लँटच्या परिसरात हा गोळीबार करण्यात आला आहे. पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही चोरटे त्याठिकाणी आले होते. यातील एका चोरट्यावर पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाआहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची ही आणखी एक घटना आहे. लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. तर याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्याचा यार्ड आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पवनचक्कीच्या यार्डमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू आहे. या अगोदर देखील चोरीच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. चोरीच्या घटनांमुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते.
मात्र, गुरूवारी मध्यरात्री लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याच्या यार्डमध्ये काही चोरटयांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाकडून चोरट्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात चोरट्याला गोळी लागली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास नेकनूर पोलीस करीत आहेत.


Recent Comments