Newsworldmarathi Nashik : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भक्ती अथर्व गुजराती (वय-३७) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील अथर्व गुजराती यांची पत्नी भक्ती यांनी घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. भक्तीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे सराफी व्यवसाय करतात. आपल्या मुलीने आत्महत्या केली, असे समजताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मृत भक्ती अथर्व गुजराती यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. भक्ती यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या फरार पतीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण सध्या ताजे असतानाच नाशिकमध्ये एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली, का पैशांचा तगदा लावला. भक्तीने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिस करीत आहेत.


Recent Comments