Newsworldmarathi Mumbai: राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, अनेकींनी लहान-मोठे उद्योगही सुरू केले आहेत. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई बँक आता शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना अधिक गतिमान झाली आहे. यापूर्वी 9 टक्के व्याजदराने मिळणारे कर्ज आता शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. राज्य सरकारच्या चार महामंडळांमार्फत (पर्यटन महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ) 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यामुळे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होईल.
कशी मिळणार कर्ज सुविधा?
एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते, तर 5 ते 10 महिला एकत्र येऊन संयुक्त व्यवसाय सुरू करू शकतात. कर्जासाठी अर्ज केल्यानंतर व्यवसायाची पडताळणी केली जाईल. मुंबई बँकेकडे सध्या 1 लाख सभासद असून, 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. या योजनेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चारही महामंडळांच्या संचालकांसह झालेल्या बैठकीत शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठ्याचा शासन निर्णय घेतला आहे.
महिलांना सक्षम करण्याचा संकल्प
ही योजना मुंबईतील महिलांना उद्योग-व्यवसायात पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना आणि इतर महामंडळांच्या माध्यमातून व्याज परताव्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे बाजारात फिरतील आणि त्यांच्या उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई बँकेमार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले आहे.


Recent Comments