Newsworldmarathi Pune: पुणे शहरासाठी दिलासादायक ठरलेली आनंदाची बातमी म्हणजे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या जलपूजन सोहळ्यात पुणेकरांना वर्षभर मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि शहरावर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण, श्री. सुभाष नाणेकर, नगरसेविका अनिता इंगळे, धनश्री कोल्हे, पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी असल्याचे सांगण्यात आले. धरणे भरली असली तरी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पाणी बचत आणि जलसंधारणाला प्राधान्य देत पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
पुणे शहर भविष्यातही जलसमृद्ध राहावे आणि नागरिकांना वर्षभर कोणत्याही अडचणीशिवाय पाणीपुरवठा व्हावा, हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.


Recent Comments