Newsworldmarathi Pune: केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे.
खरीप हंगामात देशाच्या तांदूळ उत्पादनात सुमारे १४ लाख हेक्टरने घट झाली आहे. त्यासह अपुऱ्या पावसामुळे तांदूळ पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे एकूण तांदूळ उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. उत्पादनात घट झाली तरीही जागतिक तांदूळ बाजारात भारताचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशाचे खरीप हंगामातील तांदूळ लागवडी खालील क्षेत्र सरासरी ४१२ लाख हेक्टर आहे. गतवर्षी उच्चांकी ४२८.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा ४१४.१० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत १४.३६ लाख हेक्टरने लागवड क्षेत्रात घट झाली आहे.
राज्यनिहाय कर्नाटकात ३.६१ लाख, तेलंगाणात ३.२९ लाख, झारखंडमध्ये १.८२ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, तमीळनाडूत १.२२ लाख, महाराष्ट्रात १.०२ लाख, आसाममध्ये १.२१ लाख, उत्तर प्रदेशात ७० हजार आणि हरियाणात १५ हजार, अशी लागवडीत घट झाली आहे. सर्वाधिक घट कर्नाटक, तेलंगाणा, झारखंड, मध्य प्रदेशात झाली आहे.
कृषी विभागाने तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी उच्चाकी लागवड आणि चांगल्या पावसामुळे चीनला मागे टाकून देशात १,५४० लाख टन तांदूळ उत्पादन झाले होते. यंदा एल – निनोमुळे देशभरात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे लागवड आणि उत्पादनावर परिणाम होणार आहे. उत्पादनात सुमारे ७० लाख टनांनी घट होऊन, देशाचे एकूण उत्पादन यंदा १,४७० लाख टन होण्याचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात भारताचाच दबदबा
यंदाच्या खरीप हंगामात तांदूळ उत्पादनात घट होण्याचा अंदाज असला तरीही केंद्र सरकारकडे ऑगस्टअखेर ६३९ लाख टन तांदळाचा साठा आहे. संरक्षित साठ्याच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. त्या शिवाय अन्न सुरक्षा आणि इथेनॉलसह अन्य उपयोगासाठी एका वर्षाला देशाला सुमारे ४५० लाख टन तांदळाची गरज असते. त्यामुळे देशाची गरज भागूनही निर्यातीसाठी तांदळाची उपलब्धता चांगली राहणार आहे. त्यामुळे लागवड, उत्पादनात घट होऊनही जागतिक तांदूळ बाजारात भारताचा दबदबा कायम राहण्याचा अंदाजही कृषी विभागाने व्यक्त केला आहे. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक डॉ.राजेश शाह यांनी दिली.


Recent Comments