महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा
Newsworldmarathi Pune : मध्य प्रदेशातील सागर येथे असलेल्या महार रेजिमेंटच्या मुख्यालयात घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी यशसिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली.
मागील 45 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी भीम जयंती अर्थात 14 एप्रिल रोजी राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे विनंतीपत्र पाठवण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या मागणीबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशन संसद भवनबाहेर आंदोलन किंवा दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी या बैठकीत दिली.
यावेळी लेफ्टनंट आनंद वाघमारे, सुभेदार मेजर सुभाष कंकाळ, सुभेदार मेजर पोपट आल्हाट, असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे कोषाध्यक्ष शामराव भोसले सुभेदार मोहन यादव, पुणे शाखाध्यक्ष सुभेदार संतोष वानखेडे, लुकस केदारी , राहुल नागटिळक , किरण सोनावणे , राम डंबाळे , किरण कदम यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी असोसिएशनच्या या मागणीसाठी सक्रिय पाठिंबा या बैठकीत व्यक्त केला.
कॅप्टन बाबू पोळके यांचे अध्यक्षीय भाषण झाले तर बुद्ध चव्हाण यांनी महार रेजिमेंटचा इतिहास कथन करून रेजिमेंटच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची आवश्यकता प्रभावीपणे कथन केली. किरण सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यानंतर बैठकीचे अध्यक्ष कॅप्टन बाबू पोळके, राहुल डंबाळे, लेफ्टनंट आनंद वाघमारे यांच्या हस्ते आंबेडकर स्मारक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
Newsworldmarathi Mumbai: उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय निवासस्थान सिंहगड, येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्यव बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग पश्चिम विभागाचे संचालक पी.एन. जुमले,उपसंचालक एन.एन.वडोदे उपस्थित होते.
नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना एप्रेटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
संचालक पी. एन. जुमले म्हणाले की, पूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच एप्रेटीसशिप उपलब्ध होती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांनाही एप्रेटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.
Waqf Amendment Bill : मोठी बातमी! लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर
Newsworldmarathi Delhi : लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2025 नुकतेच मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली, तर विरोधात 232 मते पडली.विधेयकाच्या मंजुरीपूर्वी, सुमारे 12 तासांच्या चर्चे दरम्यान, सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये तीव्र वादविवाद झाले.
गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकाचे समर्थन करताना, वक्फ मंडळांमध्ये बिगर-मुस्लिम सदस्यांचा समावेश केवळ प्रशासकीय उद्देशांसाठी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी विरोधकांवर “मतबँक भीती पसरवणे” असा आरोप केला.
विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेसने, या विधेयकाला “असंवैधानिक” आणि मुस्लिमांच्या मालमत्तेच्या हक्कांवर आघात करणारे ठरवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विधेयकाला मुस्लिमांना बाजूला करण्याचे आणि त्यांच्या वैयक्तिक कायदे व मालमत्तेच्या हक्कांवर कब्जा करण्याचे हत्यार म्हणून संबोधले.
विधेयकाच्या समर्थकांनी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि विविधता वाढवण्याचा उद्देश असल्याचे सांगितले, तर विरोधकांनी मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांवर संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली. हे विधेयक आता राज्यसभेत मंजुरीसाठी सादर केले जाईल.
त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार : केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ
Newsworldmarathi Delhi : देशभरात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे असून आठ लाखांहून अधिक सहकारी समित्यांमध्ये ४० लाख कर्मचारी आणि ८० लाख निर्वाचित मंडळ सदस्य कार्यरत असून सुमारे ३० कोटी सदस्य जोडलेले आहे. मात्र, आगामी पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज भासणार आहे. त्याकरिता सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय सहकार विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या तळागाळात सहकार क्षेत्र मजबुतीसाठी पुढाकार घेतला आहे.
देशातील पहिले सहकारी विद्यापीठ असलेल्या ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चे विधेयक पुण्याचे खासदार व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना राज्यसभेत मांडण्याचा मान मिळाला असून हे विधेयक वरिष्ठ सभागृहात मंजूर झाले आहे. २६ मार्च रोजी हे विधेयक लोकसभेच बहुमताने मंजूर करण्यात आले होते. त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरेल, असे मत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठावर तब्बल चार तास चर्चा झाली व याबाबत विधेयक मांडण्याची आणि सभागृहाला उत्तर देण्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवली होती. मोहोळ यांनी सहकार विद्यापीठाबाबतचे सर्व आक्षेप खोडून काढत जोरदारपणे सरकारची भूमिका सभागृहात मांडली.
स्वतंत्र सहकार मंत्रालयाची सुरुवात जुलै २०२१ पासून सुरु झाली असून साडेतीन वर्षात सहकार विभागाने मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात सहकार चळवळ मजबुतीकरणाचे काम केले. सन २०१३-१४ मध्ये सहकार विभागास केवळ १२२ कोटी रुपये देण्यात आले होते, परंतु सदर निधीत दहा पट वाढ करुन चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात या मंत्रालयासाठी ११९० कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला.
मोहोळ म्हणाले, ‘सहकार मंत्रालयाचे अंर्तगत देशात प्राथमिक कृषी पतसंस्थाचे (पॅक्स) सक्षमीकरण करण्याकरिता तयार केलेले आदर्श उपनियम ३२ राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी स्विकारले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅक्सला प्रोत्साहन देण्यात येत आहे. २५ नवे व्यवसाय पॅक्सला देण्यात आले असून आगामी पाच वर्षात २ लाख नवे पॅक्स स्थापन करण्याचे लक्ष्य आहे. मोदी सरकारने एनएसडीसीच्या माध्यमातून १ लाख २८ हजार कोटींची मदत केली असून देशभरातील साखर कारखान्यांना १० हजार कोटींची मदत आणि प्राप्तिकारात देखील ४६ हजार कोटींची माफी देण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या महत्वपूर्ण बाबी…
– सन २०२७ मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होताना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सहभाग महत्वपूर्ण
– देशातील ५० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्राशी निगडित
– देशात ४३ हजार पॅक्स कॉमन सर्व्हिस सेंटर, ३६ हजार पॅक्स प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र व ४ हजार पॅक्स प्रधानमंत्री जनऔषधालय चालू
– केंद्रीय सहकार विभागामार्फत २ हजार ५१६ कोटी रुपये खर्च करुन ६६ हजार पॅक्सचे डिजिटलायजेशन
– पुढील ५ वर्षात पॅक्सची संख्या तीन लाख करणार
– समाजातील सर्व घटकांसाेबत महिलांचा पॅक्स समितीत समावेश
– नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेटाबेसची निर्मिती
– राष्ट्रीय सहकार धोरणाची लवकरच निर्मिती
– शेतकऱ्यांसाठी जगातील सर्वात मोठी अन्न भंडारण योजनेचे काम पॅक्सच्या माध्यमातून सुरु
– त्रिभुवन सहकार विद्यापीठामार्फत सहकारी संस्थाची कार्यक्षमता, मॅनजमेंट व्यवस्था सक्षमीकरण, नवीन रोजगार निर्मिती
बूथ कार्यकर्ता ते राज्यसभेत विधेयक मांडणारा मंत्री…
मुरलीधर मोहोळ हे गेली ३० वर्षे भाजपात कार्यरत असून त्यांनी बूथ प्रमुखापासून कामाला सुरुवात केली आणि त्यांचा हा प्रवास आता राज्य सभेत विधेयक मांडणारा मंत्री इथ पर्यंत झाली आहे. खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये केंद्रीय मंत्रीपद आणि थेट विधेयक मांडण्याची संधी, या मोहोळ यांच्या प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर काँग्रेस आक्रमक
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था, मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे, अपुऱ्या दर्जाचे पॅचवर्क, ब्लॉक बसवलेल्या रस्त्यांमुळे वाढलेले अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेच्या पथविभाग प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांची भेट घेतली. या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्याचा वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. अपुऱ्या नियोजनामुळे रस्त्यांचे ब्लॉक घसरत असून, त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणं चुकीच्या पातळीवर बसवली गेल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, फुटपाथच्या उंची आणि लांबीतील विसंगतीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे काँग्रेस शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
या बैठकीत पथविभाग प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला पुणे शहरातील 54 अधिकाऱ्यांची यादी सार्वजनिक करण्याची ग्वाही दिली. तसेच, काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत स्पॉट व्हिजिट करून, शहरातील विविध ठिकाणी पाहणी करण्याचे आणि समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, पुणे शहरातील रस्त्यांसाठी एकात्मिक धोरण तयार करण्यासाठी पुढील स्तरावर चर्चा करण्याची तयारीही दर्शवली.
बैठकीत पथविभागाच्या वतीने यापूर्वी राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देखील देण्यात आली. काँग्रेस शिष्टमंडळाने मागणी केली की, पुणे महानगरपालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन छेडेल.
या , माजी सदस्य पी एम पी एम एल चंद्रशेखर कपोते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सदस्य प्रशांत सुरसे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस सुरेश कांबळे, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चेतन आगरवाल, माजी अध्यक्ष कसबा विधानसभा काँग्रेस कमिटी प्रविण करपे, काँग्रेस पदाधिकारी माजी स्वीकृत सदस्य आयुब पठाण, राजाभाऊ कदम, काँग्रेस साजिद शेख आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर लवकरच पथविभाग आणि काँग्रेस शिष्टमंडळाच्या संयुक्त पाहणी दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात येणार असून, शहरातील रस्त्यांसंबंधी सुधारणा करण्यासाठी पुढील टप्प्यात ठोस निर्णय घेतले जातील.
निर्यातक्षम पिकांसाठी धोरणात्मक पाऊल! जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचा उत्पादनवाढीवर भर
Newsworldmarathi Pune: निर्यातक्षम पिकांच्या उत्पादनवाढीच्यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा यंत्रणेने कृषितज्ज्ञ, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्यात कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी उपसंचालक संजय विश्वासराव यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
डूडी म्हणाले आगामी तीन वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्यादृष्टीने कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केळी, अंजीर, आंबा, स्ट्रॉबेरी, सूर्यफूल, करडई यासारख्या पिकांचा सामूहिक पद्धतीने विकास करण्यावर भर देण्यात यावा. कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत प्रथम शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना कृषी विभाग आणि आत्माच्या मदतीने प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. प्रशिक्षित शेतकऱ्यांमधूनच गावात ‘मास्टर प्रशिक्षक’ म्हणून जबाबदारी देण्यात यावी. शेतकऱ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विचार करुन कृषी विभाग आणि आत्मा मिळून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येतील.
कालबद्ध कार्यक्रमाच्या जनजागृतीकरीता जिल्हा, तालुका व गावनिहाय सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना पीक पद्धती, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), पाणी बचत आदीबाबत मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ‘एआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्यांचे उत्पादकता वाढवून पर्यायाने उत्पादन वाढीकरीता प्रयत्न करावे, असेही डूडी म्हणाले.
काचोळे यांनी जिल्ह्यातील विविध भागात उत्पादित होणाऱ्या पिकांबाबत माहिती दिली.
सारा तेंडुलकरची मोठी एंट्री! ई-क्रिकेट प्रीमियर लीगच्या मुंबई फ्रँचायझीची मालकीण
Newsworldmarathi Pune: सारा तेंडुलकर ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये बहुप्रतिक्षित सिझन 2 साठी मुंबई फ्रँचायझीच्या मालक म्हणून सहभागी झाल्याची घोषणा पुणे स्थित डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी जेटसिंथेसिसने केली आहे.
GEPL ही जगातील सर्वात मोठी ई-क्रिकेट आणि मनोरंजन लीग असून ती आतापर्यंत 300 दशलक्षाहून अधिक लाईफटाईम डाऊनलोड्स झालेल्या Real Cricket या खेळावर आधारित आहे. पहिल्या सिझनपासून, या लीगमध्ये अनेक पट वाढ नोंदवली गेलेली असून सिझन 1 मधील 200,000 नोंदणींच्या तुलनेत आता ही नोंदणी 910,000 पर्यंत पोहोचली आहे. जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स18 वर 2.4 दशलक्षाहून अधिक मिनिटांचे स्ट्रीम केलेले कंटेंट आणि 70 दशलक्षाहून अधिक मल्टीप्लॅटफॉर्म पोहोच यामुळे GEPL ने क्रिकेट ईस्पोर्ट्समध्ये एक अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे.
मुंबई फ्रँचायझीची मालकी घेतल्याने सारा तेंडुलकरची या भागाशी असलेली घनिष्ठ नाळ अधोरेखित होते आणि लीगच्या प्रादेशिकीकरण, नवकल्पना, नेतृत्व आणि ईस्पोर्ट्ससाठीच्या बांधिलकीशी जुळणारी आहे. नव्या भारतातील विविध उद्योजकांसह GEPL परिसंस्थेमध्ये तिचा सहभाग स्पर्धात्मक गेमिंगला नव्याने परिभाषित करण्याच्या आणि डिजिटल युगात क्रिकेट चाहत्यांचे प्रेम वाढवण्याच्या लीगच्या उद्दिष्टाला बळकटी देतो.
जेटसिंथेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक श्री. राजन नवानी म्हणाले: “मुंबई टीमच्या फ्रँचायझी मालक म्हणून सारा तेंडुलकर यांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सारा या खऱ्या अर्थाने देशाच्या भविष्यासाठीचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या भारतातील नव्या जेन Z क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर इकोसिस्टमचे प्रतिनिधित्व करतात. खेळ आणि ईस्पोर्ट्समधील सारा यांना असलेली खोल रुची आणि त्यांची प्रचंड लोकप्रियता ईस्पोर्ट्सला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या ध्येयात त्यांना आदर्श सहयोगी बनवतात. या सहकार्यामुळे GEPL ची पोहोच विस्तारली जाईल, जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील चाहत्यांशी जोडून घेता येईल आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी नव्या संधी निर्माण होतील.”
आपला आनंद आणि उत्साह व्यक्त करताना सारा तेंडुलकर म्हणाली: “क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग राहिला आहे. ई-स्पोर्ट्समध्ये त्याच्या शक्यता आणि क्षमतांचा शोध घेणे खूप रोमांचक आहे. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी घेताना एक स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं आहे. या खेळाप्रती असलेली माझी आवड आणि माझ्या शहरावर असलेलं माझं प्रेम या गोष्टी एकत्र जुळून आल्या आहेत. आमच्या प्रतिभावान टीमसोबत काम करून एक प्रेरणादायक आणि मनोरंजक ई-स्पोर्ट्स फ्रँचायझी उभी करायला मी उत्सुक आहे.”
GEPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लीग कमिशनर रोहित पोटफोडे म्हणाले: “मुंबई फ्रँचायझीच्या मालक म्हणून सारा तेंडुलकरचा सहभाग हा GEPL साठी एक महत्त्वाचा क्षण आहे. चाहत्यांसोबत तिचा दृढ संबंध आणि तिची जोशपूर्ण उपस्थिती लीगच्या प्रतिमेला नक्कीच उंचावेल. सिझन 2 अधिक मोठा आणि अधिक स्पर्धात्मक असताना तिच्या सहभागामुळे ई-क्रिकेट स्पोर्ट्समध्ये आणखी व्यापक सहभाग वाढायला मदत होईल.”
यशस्वी पदार्पणानंतर, GEPL सिझन 2 मध्ये विस्तारित टीम स्वरूप आणि प्रगत लीग डायनॅमिक्स सादर होतील. धोरणात्मक सखोलता आणि वास्तविकता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Real Cricket 24 द्वारे समर्थित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिजात खेळाडूंसह तीव्र स्पर्धात्मकताही उंचावेल. हा सिझन मे 2025 मध्ये जोरदार ग्रँड फिनालेने समाप्त होईल. तिथे सर्वोच्च संघ ‘ई-क्रिकेट आयकॉन’ या प्रतिष्ठित किताबासाठी जागतिक स्तरावर झुंजतील.
कुणाल कामराला पुणेकराचे चोख प्रत्युत्तर
Newsworldmarathi Pune: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला आहे.
युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे.
या संदर्भात वैभव वाघ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधीक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.”
नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा फ्लेक्स लावणारे वैभव वाघ हे पुणे जिल्ह्यात एक कल्पक आणि क्रियाशील नेतृत्व म्हणून प्रसिध्द आहेत. वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून वाघ ह्यांनी काम पाहिले आहे. कोरोना काळात विविध संघटना आणि गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून वैभव वाघ ह्यांनी केलेल्या कामाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. ह्याच कामावर आधारित वाघ ह्यांनी लिहिलेले #व्हायरल_माणुसकी हे पुस्तक अल्पावधीतच प्रसिध्द झाले आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन ह्या विषयात देखील वाघ ह्यांचा हातखंडा आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाघ ह्यांची राज्यभर निवडणुक व्यवस्थापन ह्या विषयावर भाषणे आयोजित केली जात. आता ह्या फ्लेक्सच्या निमित्ताने पुणेकरांशी नाळ जोडला गेलेला पुण्याचा सामाजिक कामातील वाघ एकनाथ शिंदे ह्यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय की काय अशी चर्चा पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
समान पाणीपुरवठा व कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार; आमदार योगेश टिळेकर यांची माहिती
Newsworldmarathi Pune: “शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून, आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील,” अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेशअण्णा टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेशअण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते.
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी, ९ औचित्याचे मुद्दे आणि ७ विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली. कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले. पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर व अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरु असलेली शाळा या लक्षवेधीना मंत्रिमहोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २८० कोटींचा निधी आला, मात्र, त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही, याकडे लक्ष वेधले.”
“पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून, त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे. परिणामी मुलभुत सोईसुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. उपनगरांमधील नागरिक कर भारत असूनही त्यांना विकासकामांचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल. शहरात बकालपणा वाढतो आहे. व्यापाऱ्यांकडून, विकसकांकडून बांधकामे सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली आहे,” असे ते म्हणाले.
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाशेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकाला देता कामा नये. तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीरगडावरही स्मारक व्हावे, अशी भूमिका मांडली. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली. संत सावता माळी यांच्या अरण (सोलापूर) येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी मिळावेत व त्याला ‘अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.
आमदार महेश लांडगे यांची आमदारकी अडचणीत? काय आहे प्रकरण जाणून घ्या…
Newsworldmarathi Pune : भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार झाली नाही असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत आमदार महेश लांडगे यांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आमदार लांडगे यांची आमदारकी धोक्यात येणार का अशी चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे आणि आमदार महेश लांडगे या दोघांमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत झाली. या लढतीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी 62 हजार बोगस मतदारांचा समावेश केला असून 15 हजार मतदारांचे नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप करत गव्हाणे यांनी आमदार लांडगे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आमदार लांडगे यांनी प्रशासनाला हाताशी धरून नियोजनबद्ध भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असल्याचे या याचिकेत गव्हाणे यांनी नमूद केले आहे.
या याचिकेची दखल न्यायालयाने घेतली असून न्यायाधीश आर.आय. छागला यांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी प्राथमिक सुनावणी झाली. या सुनावणीनंतर आमदार लांडगे यांना 15 एप्रिल पर्यंत याचिकेतील आरोपांना उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

