पुण्यात १२ एप्रिलला होणार २७ वे विश्वबंधुता साहित्य संमेलन

0
Newsworldmarathi Pune: विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन या संस्थांच्या वतीने २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तिरंगा महावस्त्र, भारताचे संविधान आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होईल. प्रसंगी स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे प्रा. चंद्रकांत वानखेडे आणि प्रा. शंकर आथरे यांची उपस्थिती राहील.” दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयित्री सीमा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘जल्लोष अभिजात मराठीचा’ काव्यसंमेलन होईल. यावेळी संगीता झिंजुरके, डॉ. अशोककुमार पगारिया, सीमा झुंजारराव, शिल्पा कुलकर्णी, चंदन तरवडे, मधुश्री ओव्हाळ आणि विनोद सावंत यांची उपस्थिती राहील. २५ कवी यामध्ये सहभागी होतील. त्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे ‘सुवर्णमहोत्सवी विश्वबंधुता लोकचळवळीची प्रशंसनिय यशोगाथा’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. सविता पाटील, प्रा. भारती जाधव आणि प्रा. सायली गोसावी हे संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत, असे रोकडे यांनी नमूद केले.

हा आठवडा पावसाचा! राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Newsworldmarathi Pune : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि उष्णतेच्या लाटांचा अनुभव येण्याची शक्यता आहे. विशेषतः, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवसांत (२ एप्रिलपासून) काही भागांत अवकाळी पावसाच्या सरी आणि गडगडाटी वादळांची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी हवामानातील बदलांबाबत सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागांत पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सध्याचे हवामान ढगाळ असून, आर्द्रता वाढली आहे. तसेच, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेती आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मध्य महाराष्ट्रात सध्या चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणातील खालच्या आणि वरच्या थरांमध्ये विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगांच्या वाढीस मदत होत आहे. परिणामी, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि काही भागांत गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. डॉ. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्थिती मागील दोन दिवसांपासून दिसून येत आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याबाबत चौकशी करा : सुनील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
Newsworldmarathi Pune : ‘पीएमआरडीए’ विकास आराखड्याच्या जागांचे आरक्षण चुकीच्या पद्धतीने आणि अर्थिक गैरव्यवहार करून टाकण्यात आल्याची शक्यता आहे. त्याबाबत काही हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी आणि हे गैरप्रकार करणाऱ्यांना जबाबदार धरावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई मेल द्वारे पाठवले आहे. गैरप्रकार झालेला हा विकास आराखडा रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच सुनील माने यांनी, हा विकास आराखडा करण्याचे काम सुरू असताना मुंबईतून दोन खासगी व्यक्ती पुण्यात येऊन या कामात सहभागी होत होते. या प्रकरणात रोख रक्कम आणि चेकने सुद्धा व्यवहार झाल्याची आमची माहिती आहे, असा आरोप केला आहे. काही अधिकाऱ्यांची वाढलेली मालमत्ता, त्यांनी विकत घेतलेल्या जमिनी याबाबत ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी या प्रकरणात सर्वांवर जबाबदारी निश्चित करून दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विकास आराखडा रद्द झाल्याने पुणे परिसराचे नियोजन पुन्हा अनेक वर्षे मागे गेले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण हे सरकारला निश्चित करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी लागेल. अन्यथा जनतेचा वेळ, पैसा आणि परिश्रम, हे अर्थशून्य होईल. त्यामुळे या संबंधित सर्वांची चौकशी केली पाहिजे. यानंतर विकास आराखडा करताना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील तज्ञ व नागरिक यांचा सहभाग घ्यावा. ठिकठिकाणी चर्चासत्रे व कार्यशाळा घेऊन लोकांना सहभागी करावे. बांधकाम व्यवसायिकांना, खासगी व्यक्तींना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे आणि कालबद्ध नियोजन करून विकास आराखडा लोकांसमोर आणावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षण घेत आहेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू

0
Newsworldmarathi Pune: तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै.धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .सुट्ट्यांमुळे लहान मुले पोहण्यासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे जलतरण तलाव फुल होत आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ तपन कुमार पाणिग्रही हे या ठिकाणी मुलांना दर्जेदार पद्धतीने होण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अत्यल्प फी मध्ये दर्जेदार पद्धतीने महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये मुलांना प्रशिक्षण लाभत असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे त्यामुळे उन्हापासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत लहान मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जलतरण तलावांवर येत आहेत. बच्चे कंपनी या जलतरण तलावावर सकाळपासूनच गर्दी करत आहेत. बाणेर परिसरातील इतर जलतरण तलावांच्या मानाने महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर माफक दरामध्ये नागरिकांसाठी कोचिंग तसेच पोहण्याच्या तलावाची सोय उपलब्ध केली असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकाचे देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाणेर परिसरातील खाजगी जलतरण तलावांवर पोहणे शिकण्यासाठी पाच ते सात हजार फी आकारले जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना ही फी परवडत नाही परंतु महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवर अत्यंत कमी फी मध्ये कोचिंग उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील या ठिकाणी पोहण्यासाठी दर्जेदार कोचिंग मिळत आहे. बाणेर येथील महानगरपालिकेच्या ताम्हाणे जलतरण तलावामध्ये मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असल्यामुळे परिसरातील नागरिक पोहण्यासाठी या जलतरण तलावाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच शॉवरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच पोहण्यासाठी पोहण्याचा ड्रेस कंपल्सरी करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेने अत्यंत अल्प दरामध्ये बाणेर परिसरामध्ये पोहोण्याचा तलाव नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत तसेच लहान मुलांबरोबरच पालक देखील या तलावामध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

रमणबाग शाळेत उभारली ‘सद्गुणांची संकल्प गुढी

0
Newsworldmarathi Pune: न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये वर्षप्रतिपदा गुढीपाडव्या प्रीत्यर्थ शाला समिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर, सर्व पदाधिकारी व शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थी मंत्रांच्या हस्ते अभिनव गुढी उभारण्यात आली.ज्ञान,श्रम,मूल्य संस्कार,एकी,कर्तृत्व,विज्ञान इत्यादी गुणांची जोपासना नव वर्षात करण्याची ‘संकल्प गुढी’ प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ चारुता प्रभुदेसाई यांच्या कल्पनेतून उभारण्यात आली. या कार्यक्रमाला चित्रकला शिक्षिका अंजली मालुसरे शुभांगी पाखरे तसेच मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षक अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यात आणखी एक होणार नवा महामार्ग

Newsworldmarathi Team: केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राला आणखी एक महामार्ग मिळणार आहे. त्यामुळे ७ तासांचा प्रवास फक्त २ तासांत करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे. या महामार्गासाठी १५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होईल अशी माहिती दिली. नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहात सांगितले. आगामी दोन वर्षांत दोन पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास २५ हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची संख्या किती राहिली याचा एक डेटा सादर करत गडकरींनी अपघात नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारची भूमिका काय ? याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे यासंदर्भातही सभागृहाला माहिती दिली. यावेळी गडकरी म्हणाले, वाहनाचा जास्त वेग, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. म्हणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे, असे त्यांनी सांगितले

द्राक्ष निर्यातदारांचा हंगाम गोड!

Newsworldmarathi Team : सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये यंदाच्या हंगामात द्राक्ष मालाची असणारी कमी, अवकाळी पाऊस न पडणे त्यामुळे मुबलक सूर्यप्रकाश, द्राक्षाला असणारी गोडी यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम गोड ठरला आहे. गेल्या सहा ते सात दिवसांत स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षमालाचे दर पाच रुपयांपर्यंत कमी झाले असले तरी येत्या काही दिवसांत हे दर पुन्हा सुरळीत होतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत १ लाख १० हजार ५३१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यापासून अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. अजून ३० टक्के द्राक्षमाल शिल्लक असून, दीड लाख मेट्रिक टनापर्यंत द्राक्षाची निर्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक असणारा महाराष्ट्र आणि राज्यातील एकूण उत्पादनाच्या ९१ टक्के उत्पन्न एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. पण, गेल्या काही वर्षांत अवकाळी पावसाचा कोप, व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे अनेक उत्पादकांनी नको ती द्राक्षशेती म्हणत बाग तोडले होते. मात्र, सन २०२४-२५ चा द्राक्ष हंगाम उत्पादकांसाठी लाभदायक ठरला असून, यावर्षी मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याचा परिणाम द्राक्ष उत्पादकांना दराबाबत दिलासा मिळाला आहे. निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक या चार तालुक्यांत ५८४१८.२४ हेक्टर क्षेत्रात यावर्षी द्राक्ष लागवड होती. थॉमसन, सीडलेस, माणिक चमन, सुपर सोनाका, गणेश हे हिरवे वाण तर शरद सीडलेस, क्रीम्सन सीडलेस, फ्लेम सीडलेस, रेड ग्लोब, मेडिका हे रंगीत वाणाचे द्राक्षपीक जिल्ह्यात घेतले जाते. युरोपीय देशात नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, यूके तर नॉन युरोपियन देशात रशिया, युएई, कॅनडा, तुर्की, चीन या देशात द्राक्षनिर्यात होते. दरम्यान, द्राक्ष निर्यातदार पूर्वा चव्हाण यांनी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक उत्पादकांचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा धडा घेत फसवणूक होणार नाही, असा विश्वास निर्यातदारांमध्ये निर्माण झाला आहे.

इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली : गणेश शिंदे

0
Newsworldmarathi Pune : सचोटी इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत जीवन आहे असे सांगत स्नेह जिव्हाळा जिवंत राहू द्या आभासी दुनियेतून बाहेर पडून एकमेकांना भेटा चर्चा करा निसर्गावर प्रेम करा अशा अनेक मुद्द्यांना हात घालत. नातेसंबंध, मैत्री व व्यवसाय यांची सांगड कशी घालावी व जीवनाचा आनंद कसा घ्यावा याबाबत लेखक गणेश शिंदे यांनी अनेक उदाहरणाचे दाखले देत रियल इस्टेट च्या सभासदांना संबोधित केले. असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट या संस्थेच्या सभासदांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. गेली पंधरा वर्षे सातत्याने असोसिएशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. असोसिएशन च्या उपक्रमाची माहिती देताना अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले की व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात असोसिएशन अग्रेसर असून गेली तीन वर्ष मुद्रांक शुल्क वाढ न करणे साठी वेळोवेळी मुख्यमंत्री, महसूलमंत्री,नोंदणी निरीक्षक यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य मांडून असंघटित ग्राहकांन साठी लढा उभा केला आहे तसेच भाडेकराराचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन होण्या संदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्तांशी संवाद साधून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर प्रमाणित गुंठेवारी घरांच्या पुनर्विक्रीत सर्वसमण्याची होणारी मुस्कटदाबी त्वरित थाबण्या साठी पुणे मनपा आणि महसूल खात्याने इंटिग्रेट करून माहितीचे आदान-प्रदाना चे पाऊल उचलून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी भूमिका घेत सर्वसान्याचा आवाज सरकार दरबारी पोहोचवला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी असोसिएशनने “आवाज जनतेचा” ह्या पुरस्काराने पत्रकार दिगंबर दराडे आणि संजय कडू यांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर (ASP) संस्थेचे सचिव मंगेश पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सचिन शिंगवी , उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, खजिनदार उमाशंकर यादव, सचिव राजेंद्र दोशी, अनिल पाटील ,गणेश शेलार, कैलास फोफालिया, गणेश घुमे, सचिन कात्रे, एस के शिंगवी, प्रशांत गांधी, शांतीलाल बोरा यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र चौकसे यांनी केले

डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना ‘एआयबीडीएफ’तर्फे गोंदण पुरस्कार जाहीर

0
Newsworldmarathi Pune त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने थोर समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे, विजय नांदगावकर आदी उपस्थित होते. अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याला यंदाचा पहिलाच ‘गोंदण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. २ एप्रिल २०२५) सायंकाळी ६.३० वाजता डेक्कन क्लब हाऊस, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार असून, पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रसिद्ध निवेदक प्रवीण जोशी आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.” डॉ. शरद मुतालिक म्हणाले, “त्वचेच्या आजारांकडे समाज आजही तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अशा रुग्णांना आजारासोबत अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक व सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सुरु केलेला सामाजिक उपक्रम आहे. अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या फाउंडेशनमार्फत लोकांमध्ये ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासह लवकर निदान व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन, गरजू रुग्णांना मदत देण्यात येते. तसेच या आजारांतून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव पीडितांपर्यंत पोहचवून त्यांना प्रगत उपचार घेण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. यासह आधुनिक औषधोपचार सर्वांसाठी सुलभ व परवडणारे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.”

औंध रोड, बोपोडी भागातील वाहतूक कोंडीवर उपाय योजना करा : सुनील माने यांची मागणी

Newsworldmarathi Pune : औंधरोड, बोपोडी भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लोकांचा वेळ वाया जात आहे. याबाबत उपाय योजना करण्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच वाहतूक शाखेचे प्रभारी मनोज पाटील यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी आज मनोज पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले. लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन या भागातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी या भेटीत दिले. सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, औंध रोड आंबेडकर चौक येथे नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. त्यातच या भागात सांगवी, स्पायसर कॉलेज या भागातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून येथील मुळा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल औंधरोड येथील चंद्रमणी संघ येथून सुरु होतो. या पूलावरून प्रवास करणे गैरसोयीचे होत असल्याने पुलावर अत्यंत कमी वर्दळ आहे. औंधरोड कडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना या पुलावरून जाण्यासाठी डिव्हायडर नसल्याने पुणे विद्यापीठाकडून वळसा घालून यावे लागते. हा त्रास वाचवण्यासाठी लोक विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवासासाठी जातात. यामुळे या रस्त्यावर गर्दी होते. त्याचप्रमाणे सांगवी कडून येणारी वाहने औंधरोड येथे चंद्रमणी संघाजवळ येतात. पुणे विद्यापीठाकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर अगोदरच गर्दी झालेली असते अशावेळी येथे बॉटल नेक तयार होऊन पुन्हा या रस्त्यावर गर्दी वाढते. जवळच येथे औंध रोडचा पीएमपीएमएलचा बस थांबा तसेच रिक्षा स्टँडही आहे. यामुळे आंबेडकर चौकातून रस्ता ओलांडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होतो. याप्रमाणेच बोपोडी कडून येणारी ब्रेमेन चौक व खडकी स्टेशन परिसराकडे जाणारी वाहने औंधरोड आंबेडकर चौकात येतात यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याप्रमाणेच खडकी स्टेशन पासून रेंजहिल्सकडे वळताना तसेच खडकी पोलिस स्टेशन जवळील बोगद्याजवळ नेहमी गर्दी होऊन वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. दररोज होणाऱ्या या त्रासाला वाहनधारक वैतागले आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यापुढेही एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी कृपया आपण पाहणी दौरा आयोजित करून औंधरोड, बोपोडी, खडकी येथील वाहतूक समस्येचा आढावा घ्यावा व येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.