पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
Newsworldmarathi Pune : मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला राज्यमान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपली वाचनसंस्कृती जपण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राज्यभर राबवता येईल, महोत्सवाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे आचार्य पवन त्रिपाठी, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. सोमनाथ पाटील, विशाल चोरडिया, कृष्णकमार गोयल, संयोजन समिती सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकाच लेखकाच्या सर्वाधिक पुस्तकांच्या प्रदर्शन याचा गिनेस विश्वविक्रम परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर महाराज यांच्या नावे नोंदवला गेला. या विक्रमाचे प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एनबीटीला पुढील तीस वर्षांसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सव इतका चांगला आहे म्हणूनच मी पुन्हा येईन, दरवर्षी येईन असे वाटते. पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकरांचा ज्ञानासाठी उत्साह आहे. शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम येत्या काळात महाराष्ट्रात करता येईल. असा महोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आयोजित केला जाईल. इतिहासात ग्रंथांचे महत्त्व मोठे आहे. आपले ज्ञान किती खोल होते याचे उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे. कलेपासून शल्यचिकित्सेपर्यंतचे ज्ञान तिथे दिले जायचे. या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळल्यावर ती तीन महिने जळत होती. भारतीय सभ्यता सर्वांत प्राचीन आहे आणि ती चिरंतन सुरू राहिली आहे. चहुदिशांनी येणारे ज्ञान घेतले पाहिजे हे आपली संस्कृती सांगते. या देशाने नेहमी ज्ञानाची, ग्रंथांची पूजा केली. डिजिटल काळात ग्रंथ, पुस्तकांचे काय होईल याचे उत्तर तरुण पिढी देईल. एआय संकलन करू शकते, सृजन करू शकत नाही. तंत्रज्ञान ज्ञानाचे नवे दालन उघडून देते. तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भाषांतील पुस्तके सहजपणे अनुवाद होऊन वाचता येतात. समाजातील मूल्ये टिकण्यासाठी वाचन संस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात सर्वाधिक विश्वविक्रम करणारे शहर असा एक विक्रम नोंदवला जाईल. या महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून केली जाईल.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महोत्सव इतका मोठा झाला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला जावे, असे राज्यभरातील साहित्यप्रेमींना वाटावे असा हा महोत्सव होत जाईल. महाराष्ट्राची वाङ्मयीन परंपरा पुढे जाणारा, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारा हा महोत्सव आहे.
मिलिंद मराठे म्हणाले, की लेखकांबरोबर काम करणे हे राष्ट्रीय पुस्तक न्यासचे उद्दिष्ट आहे. संपन्न साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील लेखक, प्रकाशक, अनुवादकांबरोबर एनबीटी काम करणार आहे. त्यासाठी समन्वय बैठक आयोजित केली जाणार आहे. गणेशोत्सव, सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे आता पुणे पुस्तक महोत्सव ही ओळख निर्माण होत आहे. एनबीटीकडून दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची पुण्यात सुरुवात करण्याचे नियोजन आहे. शांतता पुणेकर वाचत आहेत या धर्तीवर शांतता महाराष्ट्र वाचत आहेत असा उपक्रम राबवून वाचन संस्कृतीला देता येईल.
राजेश पांडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तकांवर प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पुस्तकांवर मराठी माणसांचे प्रेम आहे. शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात साडेचार लोक सहभागी झाले. चळवळीला जनतेचा आशीर्वाद मिळाला की सकारात्मक परिणाम कसा होतो याचे हा उपक्रम उदाहरण ठरला. १०१ महाविद्यालयांच्या सहभागातून ग्रंथदिंडी झाली. गेल्यावर्षीपेक्षा तिप्पट मोठे प्रदर्शन होणार आहेत. यंदा २५ लाख पुस्तके विकली जातील. हा महोत्सव पुण्याची गरज होती. संविधान शब्दाचा विश्वविक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दालन, लिट फेस्टमध्ये मान्यवर ४५ व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुलांसाठी चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक महोत्सवासह खाद्य महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे.
उत्कट भावकाव्यातून पुणेकर रसिकांना उमगले संवेदनशील कवी नरेंद्र मोदी
Newsworldmarathi Pune : ‘सम्बन्ध आएँ, आ-आ के बह जाएँ, छोड जाएँ आँखों में एकाध आँसू’, ‘मेरे आसपास खिची एक..’, ‘मनुष्य की टोली हो या मेला’, ‘जगत् जननी’, ‘उत्सव’, ‘कारगिल’, ‘जिंदा दिल’, ‘भावमुद्रा बोले बसंत’, ‘अचानक’, ‘विस्मयकी सुबह’, ‘एकाध आँसू’ अशा विविध काव्यरचनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविमनाची ओळख आज पुणेकर रसिकांना झाली.
निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 14) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला.
माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, सुनील महाजन, निकिता मोघे, योगेश सोमण, डॉ. सलील कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, हरिदास चरवड, आदित्य माळवे, प्रकाशक सु. वा. जोशी मंचावर होते.
या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‘नयन हे धन्य हे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
‘मन का गीत’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची होती तर संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे होते. दिग्दर्शनाची बाजू प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्यविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
मोदीजी यांच्या शब्दांना संगीतबद्ध करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. मोदीजींच्या कविता ध्यासातून, देशात केलेल्या भ्रमंतीतून प्रकट झालेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते, अशा भावना डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
एकता सेवा प्रतिष्ठानचा वतीने निराधारांना ब्लॅंकेट वाटप
Newsworldmarathi Pune : श्री दत्त जयंतीच्या अवचित साधत गोरगरिबांना कडाक्याच्या थंडीत संरक्षण म्हणून उबदार रग (ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे गणेश शेरला यांच्या माध्यमातून निराधारांसाठी मायेची ऊब उपक्रम राबविण्यात आला.
एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व होम हवन करत श्री दत्त महाराज पुजन करण्यात आले.
समाजातील निराधार बांधवांना माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून हा उपक्रम करत असल्याचे एकता सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेलार यांनी सांगितले.
यावेळी आयोजक गणेश शेरला, रविंद्र मोरे, संजय गावडे,अनिल पवार, नाना क्षिरसागर,सलिम सय्यद, बाळासाहेब शेलार, तानाजी चव्हाण,दिपक शिपकुले, गणेश थिटे, मारूती कांबळे, मनोज कांबळे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताह
Newsworldmarathi Pune : द पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘जलसा’ या सांस्कृतिक सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेशभाई शहा यांच्या शुभहस्ते या सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
या सांस्कृतिक सप्ताहांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचे अनावरण याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना या सांस्कृतिक सप्ताहात जास्तीत जास्त सहभाग घेण्यास प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजेशभाई शहा यांनी आपल्या संबोधनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करीत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. राजश्री पटवर्धन, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख श्वेता परदेशी, पर्यवेक्षिका स्मिता तेंडुलकर, पर्यवेक्षिका डॉ. मंजू राकेश तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यलयातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. अपर्णा नरके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर जया शिंगोरे यांनी आभारप्रदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केला द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा वाढदिवस
Newsworldmarathi Pune : भारतीय सिनेसृष्टीतील द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा शंभरावा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला. साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे शनिवारी (दि. 14) सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची संकल्पना साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांची होती. अत्रे शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून गायक मुकेश यांच्या आवाजातील गाण्यावर ताल धरला. पृथ्वीराज साळुंखे या बालकलाकाराने राज कपूर यांच्या पेहरावात ‘जीन यहाँ मरना यहाँ’ या गीतावर नृत्य सादर केले.
व्हॉईस ऑफ मुकेश अशी ओळख असलेले पपिशकुमार यांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली आणि मुकेश यांनी गायलेली गीते या प्रसंगी सादर केली. सुरुवातीस पियूष शहा यांनी राज कपूर यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाविषयी माहिती दिली.
श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, अत्रे शाळेचे मुख्याध्यापक प्रविण सुपे, हरेश पैठणकर, केशव तळेकर, एस. जे. डान्स अकॅडमीच्या श्रद्धा जाधव, ज्येष्ठ गायक उमेश तडवळकर, गंधाली शहा, नरेंद्र व्यास, ऋत्विक अडमुलवार, गणेश गोळे, प्रथमेश अडमुलवार, दाजी चव्हाण, मिलन म्हेत्रे आदी उपस्थित होते.
प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणचा दणदणीत विजय
Newsworldmarathi Pune : प्रो कबड्डी लीगमध्ये यापूर्वीच आव्हान गमावलेल्या बंगळुरु बुल्स संघाला आणखी निस्तेज करताना एकामागून एक चार लोण देत पुणेरी पलटणने शुक्रवारी झालेल्या सामन्यात ५६-१७ असा दणदणीत विजय मिळविला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांच्या चढायांना गौरव खत्री आणि अमन यांच्या बचावातील हाय फाईव्हची सुरेख साथ मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गुणांपेक्षा तिप्पट गुणांनी विजय मिळवून पुणेरी पलटण संघाने क्रमवारीत सातवे स्थान गाठत बाद फेरी गाठण्याचे आपले आव्हान कायम राखले.
बंगळुरु संघासाठी लीगमध्ये काहीच आव्हान उरलेले नाही. पण, त्यानंतरही त्यांच्या खेळाडूंनी सामन्यात खेळण्याची साधी मानसिकताही दाखवली नाही. तुलनेत पलटणच्या प्रत्येक खेळाडूने आपली भूमिका चोख बजावली. पंकजने चढाईत ५, मोहित आणि आकाश शिंदेने ८ गुणांची कमाई केली. या तिघांच्या चढाया कमी पडल्या म्हणून की काय आर्यवर्धन नवलेने एक मिनिट शिल्लक असताना एका चढाईत पाच गुणांची कमाई केली. गौरवने ६ आणि अमनने ५ गुणांची कमाई करुन बचावाची बाजू समर्थपणे सांभाळली. सर्वोत्तम सांघिक खेळ हे पलटणच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले असले, तरी संपूर्ण सामन्यात बचाव भक्कम असूनही त्यांनी परदीप नरवालला शांत ठेवण्यात मिळविलेले यश महत्वाचे ठरले. बंगळुरु कडून परदीपने सात गुणांची कमाई केली.
पूर्वार्धात ढासळलेल्या बंगुळुर संघावरील आपली पकड अधिक घट्ट करताना पलटणने उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला बंगळुरु संघावर तिसरा लोण चढवला. यानंतर पलटणचा प्रत्येक चढाईला गुण, बचावात गुण हा वेग उत्तरार्धाच्या पहिल्या सत्रात कायम राहिला. बंगळुरु बुल्स संघ अक्षरशः निष्प्रभ झाला होता. पहिले सत्र संपताना बंगळुरुला आणखी एक लोण स्विकारावा लागला. तेव्हा पलटणने ४३-१२ अशी ३१ गुणांची मोठी आघाडी घेत उत्तरार्धाचे अखेरचे सत्र औपचारिक राहणार हे स्पष्ट केले. अखेरच्या पाच मिनिटांत पलटण संघाने राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी देत चार खेळाडू बदलले. याचा फायदा घेताना परदीप नरवालने अव्वल चढाई करत तीन गुणांची कमाई केली आणि हाच काय तो बंगळुरु संघासाठीचा सामन्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. गुणांची कमाई कायम राखत पलटण संघाने दोन मिनिट शिल्लक असताना गुणांचे अर्धशतक साजरे केले. आर्यवर्धन नवलेने शानदार उडी घेत एकाच चढाईत पाच गुणांची कमाई करुन आधीच खचलेल्या बंगळुरुच्या जखमेवर मीठ चोळले.
आव्हान संपुष्टात आलेल्या बंगळुरु बुल्सविरुद्ध खेळताना पुणेरी पलटणच्या खेळाडूंना वर्चस्व राखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले नाही. बंगुळुरुच्या एकाही खेळाडूची देहबोली आपण सामना खेळतोय अशी नव्हती. घरच्या मैदानावर अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या पलटण संघाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. पंकज मोहिते, आकाश शिंदे, मोहित गोयत यांनी आपल्या चढाया चोख केल्या आणि अमन, गैरव खत्रीने बचावाची बाजू तेवढ्याच ताकदीने सांभाळली. पूर्वार्धातच दोन लोण चढवत पुणेरी पलटणने आपले वर्चस्व राखले. मध्यंतराचा २६-७ असा गुणफलक पुणेरी पलटणचे वर्चस्व आणि विजय निश्चित करणारा होता. पूर्वार्धाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगळुरु संघाला केवळ एका गुणाची कमाई करता आली. एकाही आघाडीवर बंगळुरुचे खेळाडू प्रयत्न करताना दिसून आले नाहीत
हिंदू सेवा महोत्सवात घडणार हिंदू सेवा व संस्कृती चे दर्शन
Newsworldmarathi Pune : हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे. दिनांक १९ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान स.प.महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, प.पू.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, इस्कॉन चे गौरांग प्रभू, ज्योतिषरत्न जैन मुनी लाभेश विजय म.सा. यांच्या हस्ते होणार आहे. मठ-मंदिरांच्या सेवाकार्याचे प्रदर्शन, जैन तत्वज्ञानावर आधारित भव्य पॅव्हेलियन, शिव गौरवगाथा महानाट्य, शिख समाजाच्या चार शहजादे बलिदानावर आधारित लाईव्ह शो, १ हजार बालिकांचे कन्यावंदन, १ हजार आचार्य वंदन, १ हजार वादकांद्वारे मृदुंग वादन, १ हजार मातृ-पितृ वंदन, शेकडो महिलांद्वारे अथर्वशीर्ष, श्रीसुक्त पठण, विष्णू सहस्त्रनाम व सौंदर्य लहरी पठण, देशभक्ती जागरण आधारित अनेक कार्यक्रम, वीरमाता व वीरपत्नी सन्मान सोहळा,दगडूशेठ गणपती मंदिरा द्वारे मोफत आरोग्य शिबीर, संत संमेलन असे असंख्य कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाला देशभरातील साधूसंत, राज्यपाल, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यांची उपस्थिती देखील असणार आहे.
गुरुवार, दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता १ हजार बालिकांचे कन्यावंदन आणि सायंकाळी ७.३० वाजता सफर-ए-शहादत हा पंजाबी कलाकारांचा साऊंड व लाईट शो हे प्रमुख आकर्षण असणार आहे. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीर पत्नी सन्मान सोहळा होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता शिव गौरव गाथा हे महानाटय सादर होईल.
शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी तब्बल ३ हजार पुणेकरांच्या उपस्थितीत मातृ-पितृ वंदनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. तर, दिवसभरात चेंदा मेलम, केरळी वाद्यवादन, भरतनाट्यम नृत्यप्रकार सादरीकरण कार्यक्रम होईल. शेवटच्या दिवशी रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी १ हजार वादकांचे मृदुंग वादन हा दुपारी ४ वाजता उपक्रम होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुण्यातील प्रमुख संस्था, मंदिरे यांसह राज्यातून अनेक संस्था, प्रमुख देवस्थाने, संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. केवळ हिंदू शक्तीचे दर्शन घडविणे हा महोत्सवाचा उद्देश नसून हिंदू संस्कृतीतील संस्कार, सृष्टी संवर्धन, देशभक्ति जागरण, नारी सन्मानमध्ये अभिवृद्धी, पर्यावरण संरक्षण, इकॉलोजी संतुलन याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
एकविसाव्या शतकात धार्मिक – सामाजिक संस्थांनी कशा प्रकारे वाटचाल करावी, समाजातील गरजूंसाठी कशा प्रकारे उभे रहावे, याचे मार्गदर्शन देखील महोत्सवात केले जाणार आहे. संत संमेलनासारख्या प्रमुख कार्यक्रमाद्वारे संत महंतांचे विचार ऐकण्याची आणि नाटक व सादरीकरणाद्वारे हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. चार दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे.
माजी सैनिकांचे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
Newsworldmarathi Pune : सेवानिवृत्त फौजी 355 लोकांची 30 कोटी पेक्षा जास्त पैशांची फसवणूक एस. जी. ट्रेडिंग कंपनीने केली आहे. त्याबाबत कायदेशीर फिर्याद 3 ऑगस्ट 2024 रोजी मुंडवा पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे.परंतु अजूनही न्याय मिळाला नसल्याने माजी सैनिक कुटुंबियासह आंदोलनास बसले आहेत.पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसून त्या विरोधात सर्व सेवानिवृत्त माजी सैनिक लोक आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करीत न्याय मिळण्याची मागणी करीत आहेत.
सदर केस बाबत आम्ही सर्व फिर्यादी यांनी वारंवार आर्थिक गुन्हे शाखा पुणे अधिकाऱ्यांना भेटून आमची सर्व हकीकत त्यांच्यासमोर मांडली आहे. एकूण 353 लोक या केस मध्ये फिर्यादी असून सर्वांच्या जाब जवाब झालेले आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी शुभांगी मोहिते, निकिता शितोळे, सौरभ गजरे, गंगाधर मुळे, मुख्य आरोपी सुरेश गाडीवडार, सौ. किरण दलाल अमर शेलार, संकल्प चव्हाण, संजय सिंग, सुभाष गाडीवडर व इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखा यांनी आज रोजी पर्यंत कोणतीही विचारपूस किंवा तपास केले नाही व यापैकी कोणत्याही आरोपींना आज रोजी पर्यंत ताब्यात सुद्धा घेतले नाही अशी खात्रीलायक माहिती आमच्यापर्यंत आहे. सदर केस मध्ये असलेले आरोपी यांना आज रोजी पर्यंत का ताब्यात घेतले गेले नाही व वरील सर्व संघटित गुन्हेगारांना का मोकळा सोडले गेले आरोपींना अटक करून न्यायालय पुढे सादर करण्यासाठी का विलंब लावला जात आहे. याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे सदर केसचे इन्वेस्टीगेशन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला समाधानकारक उत्तर दिले जात नाही.
आम्ही सर्व देशाची सेवा करून फौज मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रायव्हेट फंडाच्या मिळालेल्या पैशाची पूर्णपणे एस. जी. ट्रेडिंग कंपनी कडे गुंतवणूक केली होती. सदर कंपनीने आमची मोठी फसवणूक केल्यामुळे आम्ही सर्व गुंतवणूकदार यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही सर्वांनी पुणे पोलिसांकडून केली होती मात्र ते पूर्ण होत नसल्याचे आज रोजी आम्हाला दिसून येत आहे. दिलेल्या फिर्यादनुसार सर्व आरोपींना अटक न केल्यामुळे पुणे पोलिसावर आमचा संशय वाढत आहे.
एस.जी. ट्रेडिंग कंपनीचे मालक व सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांन त्वरित अटक करून न्यायालय पुढे सादर करावा संबंधित सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदार यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
यावेळी पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार, माजी सैनिक देवेंदू कुमार माईति, सौ अलका शिंदे माजी सैनिक यांची पत्नी, लालसिंग बिजनोई, निकम कमलाकर, सौ मुक्ता चव्हाण, महेश बागडे, रजनीकांत मोरे, इत्यादी माजी सैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
मेट्रोवूमन ते मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव कसा राहिला अश्विनी भिडेंचा प्रवास
Newsworldmarathi Mumbai : success story मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. त्यामुळे आता अश्विनी भिडे यांनी मेट्रोतून थेट मंत्रालयात जाणार आहे. मेट्रोत असताना त्यांनी त्यांची जबाबदारी चोख पाळली होती.त्यामुळे आता त्या ही नवीन जबाबदारी कशा पार पाडतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अश्विनी भिडेंनी याआधी मेट्रो ३ ची जबाबदारी पार पाडली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणूनदेखील त्यांनी काम केलं आहे. पालिका, मेट्रोमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भिडे यांच्याकडे आता मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत झाडांची कत्तल करण्यात आली होती. ते प्रकरण वादग्रस्त ठरलं होतं. त्यावेळी भिडे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भिडे यांची उचलबांगडी केली होती. पण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात महायुतीचं सरकार येताच त्यांच्याकडे पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवण्यात आली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या आठवड्याभरातच त्यांची प्रशासकीय टीम बांधायला घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच सचिवपदी फडणवीसांनी श्रीकर परदेशींची नेमणूक सचिवपदी केली. त्यानंतर आता ‘मेट्रो वूमन’ अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधान सचिव पदावर त्यांची वर्णी लागलेली आहे. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी याबद्दलचा आदेश काढलेला आहे.
अश्विनी भिडे १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलं. कारशेडच्या मुद्द्यावरुन ठाकरे आणि अश्विनी भिडे यांच्यात मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं. नंतर २०२० साली त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं होतं
राष्ट्रवादीच्या नेत्यांना हवे अजितदादासारखे गुलाबी जॅकेट
Newsworldmarathi Mumbai : मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आपण गुलाबी जॅकेटच वापरणार असल्याचा चंग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला असल्याचे वास्तव समोर आले आहे. अनेक नेते दुकानांमध्ये जाऊन गुलाबी जॅकेटची मागणी करत आहेत.
आपल्याला संधी मिळाल्यानंतर निश्चितपणे आपण अजितदादा जे जॅकेट वापरतात त्याच रंगाचे जॅकेट वापरून शपथ घेणार असल्याचे देखील हे नेते खाजगी मध्ये बोलताना सांगत आहेत. दुकानांमध्ये जाऊन ही नेते गुलाबी जॅकेट याच रंगाचं अशा क्वालिटीच पाहिजे ही देखील मागणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गुलाबी जॅकेटला सध्या मागणी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील शपथविधीला जाताना आपण देखील गुलाबी जॅकेट घालून जायचं आणि आपल्या नेत्याला शुभचिंतन करायचं हा विचार मनात ठेवून नागपूरकडे रवाना होताना दिसत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट वापरण्यास अधिक प्राधान्य दिल्याचे सातत्याने पाहायला मिळाले अजित पवार यांच्या अंगावरचे जॅकेट खूप चर्चेत आले त्यानंतर आता ह्याच रंगाचे जॅकेट आपल्यालाही हवं असा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे.
नागपूरकरांना हुडहुडी
Newsworldmarathi Nagpur : नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत जाऊन, हिवाळ्याचं अस्सल रूप दिसत आहे.
कडाक्याच्या झोंबणाऱ्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पडू लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळी शालेय विद्यार्थी आणि कामगार गरम कपडे घालून घरातून बाहेर पडत आहेत. याशिवाय, दिवसभरातही नागरिकांना गरम कपडे घालूनच बाहेर पडावं लागत आहे. यामुळे दुकानं, शाळा, ऑफिस आणि इतर ठिकाणी थंडीमुळे सामान्य जनजीवन थोडं कठीण झालं आहे.
नागपूरमध्ये थंडीचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसून येत आहे. वाऱ्यांचा प्रभाव असा आहे की, शहरातील तापमान १० अंशांच्या खाली गेलं आहे. गुरुवारी, किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेले. त्यामुळे, नागपूर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड शहर ठरलं आहे. या थंडीत सूर्य उगवल्यानंतरही लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन गेलं आहे. लोक दिवसाही गरम कपडे घालून बाहेर पडत आहेत, हे याचे प्रमाण आहे.
देवा भाऊच्या बालेकिल्ल्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार
Newsworldmarathi Nagpur महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ( देवाभाऊ) च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी चार वाजता नागपूर या ठिकाणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यानंतर मुंबईच्या ऐवजी आता शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर या ठिकाणी पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे. दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे.
अबब! पुणे ते नागपूर विमानाचे चाळीस हजारी उड्डाण
Newsworldmarathi Pune : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर या ठिकाणी होत असल्याने अनेक जण आपल्या लाडक्या नेत्याला मंत्री होताना पाहण्यासाठी विमानाने जाणे पसंत करत आहेत. पुणे नागपूर दर अचानक चाळीस हजार रुपयावर पोहोचल्याने अनेक जण आपल्या नेत्याला शुभचिंतन करण्यासाठी समृद्धीचे मार्गाने जाणे पसंत करत आहेत.
शुक्रवारी दुपारी नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची बातमी आल्यानंतर अचानक या विमानाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे.
दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे.
भक्तिमय वातावरणात श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न
Newsworldmarathi Pune : दत्तजयंती निमित्त भवानी पेठ टिंबर मार्केट, पुणे येथे 1999 मध्ये बांधलेले श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी भगवान गुरुदेव दत्त, श्रीराम, भगवान हनुमान आणि शनि भगवान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंडित अरुण शास्त्री यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि सर्व धार्मिक विधी पार पडले.
जीर्णोद्धारासाठी उद्योगपती पुनित बालन, मा. नगरसेवक दीपक मानकर, आणि मा. पवन बन्सल यांचे सहकार्य लाभले. स्वर्गीय इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ उद्योगपती पुनित बालन यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी विशेष मदत केली.
याप्रसंगी पुणे पोलीस सहआयुक्त मा. रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, मा. राज जैन राणावत, मा. महाराज मानकर, मा. वीरेंद्र किराड, मा. अभय छाजेड, मा. जया किराड, मा. सदानंद शेट्टी, आणि मा. सुजाता शेट्टी उपस्थित होते.
हे मंदिर श्री गुरुदेव दत्त फाउंडेशन आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांच्या सौजन्याने उभारण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा : नाना पटोले
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची इच्छा ही महाराष्ट्रातील काँग्रेससाठी महत्त्वाची घटना मानली जात आहे. या घटनेमुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे नियोजन यावर प्रकाश पडतो.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यामुळे काँग्रेसवर टीका झाली.
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चार वर्षांत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात होणार विश्वविक्रम : राजेश पांडे
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आज शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातीलच दुसरा विश्वविक्रम आज शनिवारी १४ डिसेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे.
‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास पूर्ण होईल. गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा ही नवीन श्रेणी खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य मिलिंद वेर्लेकर यांनी केले आहे.
वाचन चळवळ बळकट करण्यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार
Newsworldmarathi Pune : पुणे पुस्तक महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होऊन, त्यांना भरपूर पुस्तकांची खरेदी करता यावी, यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पुस्तक महोत्सवात येणाऱ्या कोथरूड मतदार संघातील नागरिकांना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये सवलतीचे कूपन देण्यात येणार आहे. नागरिकांना सवलतीचे हे कूपन चंद्रकांत दादा पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून मिळतील. त्याचप्रमाणे सोसायटीच्या वाचनालयासाठी पुस्तक खरेदी केल्यानंतर, त्यावर १००० रुपये सवलतीचे कूपन देण्यात येईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुस्तक महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील हजारो पुस्तके ६०० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे नागरिकांना खरेदी करता येणार आहे. ही पुस्तके खरेदी करताना नागरिकांवर आर्थिक ताण येऊ नये; त्याचप्रमाणे त्यांना अधिकाधिक पुस्तके खरेदी करता यावीत, यासाठी सवलतीचे कूपन देण्यात येणार आहे. हे सवलतीचे कूपन चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड मतदार संघातील सर्व जनसंपर्क कार्यालयात १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कोथरूड मतदार संघातील नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन, सवलतीचे कूपन घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे सोसायटीमधील वाचनालयात पुस्तके खरेदी केल्यास, या खरेदीवर १००० रुपये सवलत मिळू शकते. त्यासाठी सोसायटीचे पदाधिकारी वाचनालयासाठी १००० रुपये सवलतीचे कूपन हे जनसंपर्क कार्यालयातून मिळवू शकतात, अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.
सवलतीचे कूपन मिळण्याचे ठिकाण
कोथरूड – बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारी, कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड, पुणे
औंध – शॉप नंबर 1, ओमकार कॉम्प्लेक्स, आंबेडकर चौक, डीपी रस्ता, औंध, पुणे
बाणेर – गाळा नंबर ५, श्रॉफ सुयश अपार्टमेंट, युनियन बँकेच्या शेजारी, बालेवाडी फाट्याजवळ, बाणेर, पुणे
वनाज – समाधान, नामदार चंद्रकांतदादा पाटील जनसंपर्क कार्यालय, वनाज मेट्रो स्टेशनजवळ, कोथरूड.
वाहन विमा आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्नतेसाठी शासनाला प्रस्ताव : मनोज पाटील
Newsworldmarathi Pune : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या दोन्ही प्रक्रिया संलग्न असाव्यात, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील यांनी दिली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे (जितो) कॉफी टेबल मिटअंतर्गत मनोज पाटील यांच्या समवेत संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिबवेवाडी येथील जितोच्या कार्यालयात कार्यक्रम झाला. किशोर ओसवाल, प्रसन्न मेहता यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. कॉफी टेबल मिटचे संचालक अभिजित डुंगरवाल यांनी उपक्रमाची माहिती देत सूत्रसंचालन केले.
जितो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, दिनेश ओसवाल, राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, इंदर जैन, रवींद्र सांकला, राजेश सांकला, अनिल भन्साळी, आनंद मेहता, राजेंद्र ललवाणी, अजय मेहता, चेतन भंडारी, पूनम ओसवाल, प्रियंका परमार, एकता भन्साळी, दिलीप बिनाकिया आदी उपस्थित होते.
व्यावसायिक तक्रारींचे निवारण कसे करावे, गुन्हेगारी प्रतिबंधात्मक उपययोजना कशा असाव्यात, कायदाची अंमलबजाणी काटेकोरपणे होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य कसे अपेक्षित आहे, शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेची प्रणाली विकसित करताना धोरणे काय असावीत, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने जगजागृती मोहीम राबविण्याबाबत तसेच वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेचा अवलंब करताना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा केला जाईल या विषयीची माहिती पाटील यांनी सविस्तरपणे दिली.
पाटील म्हणाले, पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसह नव्या युगाच्या तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. पुण्याभोवती रिंगरोड नसल्याने शहारातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची वारंवार कोंडी होताना दिसते. शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच पदपथांवरील अतिक्रमणे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सायबर क्राईमबाबत विचारलेल्य प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे. फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. अशी काही घटना घडल्यास 1930 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधून माहिती दिल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर
Newsworldmarathi Pune : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४-२५ शुक्रवार ( दि १३ डिसेंबर) जाहीर करण्यात आले. यंदा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर येथील गौतम ट्रेडर्सचे संचालक वस्तीमलजी तखतमलजी संकलेचा, जिल्हास्तरीय पुरस्कार राजगुरुनगरचे संगम कलेक्शनचे संचालक विजयकुमारजी मोतीलालजी भन्साळी, तर पुणे शहरासाठी रामकृष्ण ऑईल मिलचे संचालक आनंदजी श्रवणकुमारजी पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच चेंबरच्या सभासदांमधून दिल्या जाणारे पुरस्कार पुरणचंद अॅन्ड सन्स्चे संचालक सतीश पुरणचंदजी गुप्ता , तर युवा व्यापारी पुरस्कार मे. आर. बीज ड्रायफ्रूट्सचे संचालक राजीव भिमराजजी बाठिया यांना जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार संजय ऐलवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसावे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, “क्रोम बॅक्वेट”कोंढवा, पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरत ( गुजरात) चे राज्यसभा खासदार गोविंदजी ढोलकिया भूषविणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष) आणि सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजीक कार्याकर्तेप्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी शुक्रवारी चेंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदीप शहा तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
पुण्यात संचेती ब्रिजजवळ घराला आग
Newsworldmarathi Pune : पुण्यातील संचेती ब्रिजजवळील एका घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास आणि कारण शोधण्याचे काम सुरु आहे.