Newsworldmarathi Pune : दि. ९ डिसेंबर रोजी बारामती आणि इंदापूरच्या वेशीवर घडलेल्या भीषण अपघाताने दोन तरुणांचे जीवन हिरावले, तर आणखी दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघातात राजस्थानच्या चेश्ता बिष्णोई यांनी १० दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी (दि. १७) अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे आठ जणांना नवी आशा मिळाली.
चेश्ता, कृष्णाशू सिंग, दक्षू शर्मा, आणि आदित्य कणसे हे चार जण उजनी धरणाकडे जात होते. टाटा हॅरीहर गाडीचा वेग अतिवाढल्याने (१९० किमी/तास) चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी झाडाला धडकल्यानंतर लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली आणि तब्बल १५० फूट लांब घसरत गेली. यात आदित्य कणसे आणि दक्षू शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. चेश्ता आणि कृष्णाशू गंभीर जखमी झाले होते.
चेश्ता गंभीर जखमी होती. तिला पुण्यात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिने जगण्याची लढाई गमावली. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तिच्या हृदय, किडनी, डोळे, आणि आतड्यांचे दान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
चेश्ताच्या मृत्यूनंतर मंगळवारी तिला पुण्यात साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. तिच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय आदर्श ठरला आहे, आणि तो अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.