Homeभारतइंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ टोकियोत उत्साहात

इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ टोकियोत उत्साहात

टोकियो : इंडो-जपान ‘शिवस्वराज्य वन इंडिया फेस्टिव्हल’ (अखंड भारत महोत्सव) २०२६ रविवारी टोकियो येथील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे उत्साहात पार पडला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जपानमधील नागरिक, जपानी मान्यवर, कलाकार आणि विविध समुदायांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे ५०० प्रेक्षक, १४० कलाकार आणि ५० पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.

ऑल-जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स (AJAI), एडोगावा इंडिया कल्चर सेंटर (EICC) आणि अमरावती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA), जपान सरकार तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचेही सहकार्य लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात AJAI चे अध्यक्ष योगेंद्र पुराणिक यांच्या प्रस्ताविक भाषणाने झाली. ‘वन इंडिया’ या संकल्पनेतून जपानमधील विविध भारतीय समुदायांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचे माजी CBI न्यायाधीश मिलिंद गोसावी यांनी मुख्य भाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांचा आणि सामाजिक सलोख्याच्या मूल्यांचा उल्लेख केला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची पारंपरिक दिंडी, पालखी मिरवणूक, भगवद्गीतेचे पठण यांसह विविध भारतीय प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे नृत्य, संगीत आणि नाट्यप्रकार सादर करण्यात आले. जपानी कलाकारांच्या ‘तायको’ ढोलवादनानेही प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमात भारत-जपान सांस्कृतिक देवाणघेवाणीवर दोन चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात बौद्ध आणि शिंतो परंपरेतील तज्ज्ञांनी दोन्ही देशांतील आध्यात्मिक नात्यांवर प्रकाश टाकला. तसेच इंडो-जपान संबंध दृढ करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठा साम्राज्याशी संबंधित ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि भारतीय खाद्यपदार्थांच्या आस्वादाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. भजन व संगीत मैफलीने महोत्सवाचा समारोप झाला. भारत आणि जपानमधील सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments