Newsworldmarathi Pune :मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (ता. २३) रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांच्यामागे दोन कन्या,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनानं पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीनं मांडणारा तसंच शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी सात दशकांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनानं ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी भावना अजित पवार यांनी ज्येष्ट पत्रकार जोशी यांच्या निधनावर व्यक्त केली आहे.
रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांची कारकिर्द
परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले. पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या इमारतीसाठी त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी सन १९५० मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुणे येथे सायं. दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, अशा विविध पदांवर काम केले.
१९६५ च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून पंजाबमध्ये दाखल झाले होते. तसेच, बांगला युद्धाच्या वेळी त्यांनी कलकत्त्याकडे धाव घेतली होती. अहमदाबाद, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मुंबई वगैरे ठिकाणी जेथे जेथे जातीय दंगली उसळल्या तेथे प्रत्यक्षात जाऊन पत्रकारितेची भूमिका चोखपणे पार पाडली होती.
यासोबत त्यांनी पत्रकार संघटनांच्या कार्यातही आपला सहभाग नोंदवला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सलग चार वर्षे अध्यक्ष, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट या अ.भा.संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.