Newsworldmarathi Pune : बावधन येथील नागरी वन उद्यान परिसरातील वीज बिल न भरल्यामुळे काही दिवसांपूर्वी येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे झाडांना पाणी देणे अशक्य झाले आणि परिणामी झाडे वाळू लागली, काही झाडे तर सुकून गेली. हे उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी रोजच्या वावराचे आणि निवांत क्षण घालवण्याचे प्रमुख ठिकाण आहे.
मात्र, वीज नसल्यामुळे येथे अंधार पसरला आणि उद्यानाची दुर्दशा सुरू झाली. ही परिस्थिती गंभीर होत चालल्याचे पाहून नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी स्वतः समक्ष वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून तसेच फोनवरून सातत्याने संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या गलथान कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. परिणामी, मेहनतीने उभारलेले नागरी वन उद्यान ओसाड होण्याच्या मार्गावर होते.
नगरसेवक वेडेपाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच निर्णय होत नसल्याचे पाहून उद्यानातील हिरवाई वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातून ₹22,590 भरून वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे झाडांना पुन्हा पाणी मिळेल आणि उद्यान पुन्हा हिरवेगार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि उद्यानाचा नियमित वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या या तत्पर आणि सामाजिक जाणीवेच्या कृतीचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करून वेळेत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, आणि “पर्यावरण संरक्षण आणि लोकांसाठी उत्तम सुविधा देणे हीच आमची जबाबदारी आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी आम्ही प्रशासनाकडे ठोस मागणी करणार आहोत,” असे मत दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केले.


Recent Comments