Newsworldmarathi Mumbai: राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे राज्यात कार्यरत असलेल्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांना महाजन यांनी आपल्या वकिलामार्फत अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. सोबतच खडसे यांनी ज्या पत्रकाराचा हवाला देऊन हे वक्तव्य केले होते, ते पत्रकार अनिल थत्ते यांनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पत्रकार अनिल थत्ते यांनी काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओत मंत्री गिरीश महाजन यांच्यासंदर्भात एक दावा केला होता. महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा सीडीआर दाखवत रात्री अपरात्री महिला अधिकाऱ्यांशी सातत्याने का बोलत असता? असा जाब विचारल्याचा दावा थत्ते यांनी आपल्या व्हिडीओतून केला होता.
याचाच आधार घेत एकनाथ खडसे यांनी महाजनांना लक्ष्य केले होते. एका महिला आयएएस अधिकाऱ्याला रात्री दीड-दोन वाजता महाजन यांनी १०० वेळा कॉल केल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. यानंतर महाजन-खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. अखेर महाजन यांनी आपली बदनामी झाल्याचे सांगत आपल्या वकिलामार्फत खडसे यांच्यासह पत्रकार अनिल थत्ते यांना नोटीस बजावली आहे.
नोटिशीमध्ये काय?
कोणतेही सबळ पुरावे न देता पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांनी आपल्यावर आरोप केले. जनमानसांत आपली प्रतिमा मलीन केली आहे. याप्रकरणी आपण आता कोर्टातच लढणार असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही, असं एकनाथ खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


Recent Comments