Newsworldmarathi Pune : महापालिका शिक्षण मंडळासाठी खरेदी करण्यात येत असलेली शालेय स्वच्छता साहित्य खरेदीही आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या खरेदीसाठी एका विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून तो पात्र नसतानाही त्याला पात्र करून खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांसाठी केलेली साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. विभागप्रमुखांनी नकारात्मक अभिप्राय देऊनही चार कोटींची साहित्य खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता शालेय स्वच्छता खरेदीच्या निविदा प्रक्रियेवरूनही पुन्हा तक्रारी आल्या आहेत. शिक्षण मंडळासाठी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने लिक्विड अॅसिड, फिनेल व हार्डवेअर साहित्य खरेदीसाठी १ कोटीची निविदा प्रक्रिया | राबवली. मार्चअखेरीस या निविदा उघडण्यात आल्या. त्यात पात्र ठेकेदाराला काम देण्याचा प्रस्ताव भांडार विभागाकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.
मात्र, माजी नगरसेविका पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित ठेकेदाराने अटी-शर्तीनुसार कागदपत्रांची पूर्तता केली नाही, असे असतानाही प्रशासनाने बेकायदेशीररीत्या त्याला पात्र केले आहे. दक्षता व लेखापरीक्षण विभागाने काढलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Recent Comments