Newsworldmarathi Mumbai: मुंबईच्या साकिनाका परिसरात बदनामीच्या भीतीने एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांच्या आरोपी मित्राला साकिनाका पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा सोशल मिडीयावर चॅट करताना तो तिच्याकडे तिचे अश्लील फोटो पाठविण्यास सांगत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते.
याच फोटोवरुन त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. सोशल मिडीयावर तिचे फोटो व्हायरल करुन तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता. या धमकीमुळे मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने काही दिवसांपूर्वी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर तिच्या मोठ्या भावाला हा प्रकार समजला. त्यानंतर त्याने आरोपी मित्राविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मित्राला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यात त्याला दिंडोशीतील विशेष सत्र न्यायायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष सत्र न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.


Recent Comments