Homeबातम्यासोनियाजी व राहुलजींवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही: रमेश...

सोनियाजी व राहुलजींवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही: रमेश चेन्नीथला

Newsworldmarathi Mumbai: भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अनिस अहमद, खासदार प्रतिभा धानोरकर, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे.

उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले. माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांनीही यावेळी भाषणे केली.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments