Newsworldmarathi Nanded: नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पत्नीवर पिस्तूल रोखण्याचा आणि जादूटोण्याचा प्रयत्न तहसीलदाराने केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तहसीलदाराचे नाव अविनाश शेंबटवाड असून, नांदेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांचे सासर मगनपुरा परिसरात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत असे म्हटले आहे की, पत्नीला मूल होत नाही म्हणून शेंबटवाड यांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला, शिवाय तिच्यावर जादूटोण्याचा प्रयोग करण्याचाही प्रयत्न केला.
पत्नीवर पिस्तूल रोखणं, शारीरिक-मानसिक छळ करणं आणि मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करणं, अशा गंभीर आरोपांखाली नांदेडचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 11 मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फिर्यादीतील गंभीर आरोप:
– लग्नाच्या दीड वर्षांतच छळ: फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह लावण्यात आला होता. लग्नानंतरच त्यांच्यासह कुटुंबीयांनी छळ सुरू केला.
– कर्तव्यावर असताना मारहाण: पतीसोबत कर्तव्यस्थळी असताना वेळोवेळी कारण काढून मारहाण केली जायची.
– पिस्तूल रोखल्याचा आरोप: जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे.
– जादूटोणा आणि अघोरी उपचार: मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कोणाविरुद्ध गुन्हा?
या प्रकरणात केवळ तहसीलदारच नव्हे तर त्यांचे आई-वडील आणि डॉक्टर असलेले दोन भाऊ यांच्याविरुद्धही कौटुंबिक छळ तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि या प्रकरणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधातील गंभीर आरोपांमुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ माजली आहे.


Recent Comments