Newsworldmarathi Pune: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. झोपेत असतानाच त्यांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला.
डॉ. नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला होता. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली आणि जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत ‘हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ मांडला, ज्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.
भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करून त्यांनी संचालक म्हणून दीर्घकाळ कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले.
त्यांच्या पत्नी डॉ. मंगला नारळीकर या देखील ज्येष्ठ गणितज्ञ होत्या. जुलै २०२३ मध्ये त्यांचे पुण्यात कर्करोगाने निधन झाले होते.
डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


Recent Comments