Newsworldmarathi Pune: पुणे शहर जिल्हा मातंग समजाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित असा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री दिलीप कांबळे तर समाजामध्ये शैक्षणिक व समाज जागृती मध्ये उल्लेखनीय योगदान असणारे युवा आमदार अमित गोरखे यांना आज प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार आमदार सुनील कांबळे ,पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे ,सचिव अँड.महेश सकट,समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक एकनाथ सुगावकर, नगरसेविका मृणाल कांबळे, वृशाली रिठे, माजी नगरसेवक आंनद रिठे, बापू कांबळे, डॉ.भरत वैरागे, स्वाती लोखंडे तसेच अशोक लोखंडे,प्रकाश वैराळ, रवि आरडे, निलेश वाघमारे,दत्ता जाधव ,सचिन जोगदंड, राजू अडागळे, रामभाऊ कसबे यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ असे होते .
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
यावर्षी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीर लढवय्या फकीरा पुरस्कार दुर्गेश हातागळे व दिगंबर जोगदंड यांना, तर सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार कोमल शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात भव्य सभा मंडपात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाजाचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांवर आधारित समाजकार्य अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे नियोजन आणि संयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. कार्यक्रमामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Recent Comments