Newsworldmarathi Pune : निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फौजदारी प्रकरणाबाबत दिशाभूल करणाऱ्या आणि एकतर्फी बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करत विशाल चुघेरा यांचे वकील अॅड. अभय देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट (सब ज्युडिस) असून न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदाराने भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल केला असला, तरी विशाल चुघेरा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून ते न्यायालयात कायदेशीररित्या त्यांचा बचाव करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी विशाल चुघेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने एबीए क्रमांक ३६९/२०२४ मध्ये १२ मार्च २०२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान ट्रायल कोर्टात मोठी रक्कम जमा करण्यात आली असली, तरी त्याचा अर्थ गुन्ह्याची कबुली किंवा दोष स्वीकारल्याचे होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
पुढे, न्यायालयात हजर राहण्याच्या तारखेची माहिती नसल्याने ट्रायल कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. मात्र, संबंधित न्यायालयासमोर हजर राहून वस्तुस्थिती मांडल्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी हे वॉरंट रद्द करण्यात आले, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
केवळ एनबीडब्ल्यू जारी झाल्याचा उल्लेख करून अटकपूर्व जामीन, न्यायालयात रक्कम जमा करणे आणि नंतर वॉरंट रद्द झाल्याची बाब लपवून वृत्तांकन केल्यास ते दिशाभूल करणारे ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसल्याने आरोपांना दोषसिद्धी म्हणून सादर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अॅड. अभय देशमुख यांनी सांगितले की, विशाल चुघेरा यांचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून ते न्यायालयातच आपली बाजू मांडतील. खोटी, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच वृत्त प्रकाशित करण्यापूर्वी न्यायालयीन नोंदी व आदेशांची पडताळणी करण्याचे आवाहन सर्व माध्यमांना करण्यात आले आहे.


Recent Comments