Newsworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याचा आनंद मिळावा आणि दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने भातुकलीचा खेळ आयोजित करण्यात आला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी भातुकलीचा खेळ मांडण्यात आला होता. भातुकलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भांड्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजी धुणे, सोलणे, किसणे, चिरणे, पुरी लाटणे, दाणे कुटणे अशा विविध सोप्या कृती उत्साहाने आणि आनंदाने केल्या. या सर्व कृती करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग नोंदवला.
या कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू, त्यांचा उपयोग आणि विविध कृतींची प्रत्यक्ष ओळख झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होण्यास, सूक्ष्म स्नायूंच्या विकासास तसेच निरीक्षण क्षमता आणि कृतीतून शिकण्याच्या सवयीला चालना मिळाली. खेळाच्या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आनंददायी अनुभव घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.


Recent Comments