Newsworldmarathi Pune: राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट आहे. तर मराठवाडा व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. या दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार, मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यावर पावसाला अनुकूल असलेला कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. कर्नाटकच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह उपनगर आणि कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
आजच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वीजांसह वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे. एकूणच पाहता महाराष्ट्रातील हवामान सध्या मोठ्या प्रमाणावर बदलत असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात गेले काही दिवस वादळी पावसाचा अनुभव सुरू आहे. सकाळच्या वेळात उष्णता जाणवत असली तरी दुपारनंतर वादळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तापमानात सतत चढ-उतार होत असून, उकाडा अधिक जाणवत आहे.


Recent Comments