Newsworldmarathi Pune: रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना धमकी देणारा फोन केला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गणपती माथा येथील निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. कार्यालयाबाहेर त्यांची गाडी पार्क केली होती.
त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या कारच्या काचेला लागली.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीमध्ये दोघे जण दुचाकीवरुन येताना दिसत आहेत. त्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडताना निदर्शनास येत आहे. फॉरेन्सिक पथकाने येऊन परिसराचा पंचनामा करुन माहिती गोळा केली आहे.
दरम्यान, वारजे माळवाडी भागातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल धमकीचा फोन केला होता. या धमकीच्या फोन बाबत घारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही वेळाने गोळीबाराची घटना घडली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने निलेश घारे यांना काल सायंकाळी धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी वारजे पोलिस ठाण्यात केली होती. त्यानंतर ते रात्री कार्यालयात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यातील एक गोळी कारच्या काचेला लागली आहे. काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज देखील केला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.


Recent Comments