Newsworldmarathi Mumbai: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर शिवसेना फोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहांवर “जीवनभर लक्षात राहील” अशा कठोर कारवाया झाल्या असत्या, अशी जोरदार टीका शिवसेनेच्या ‘सामना’ अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘सामना’ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, ज्यांनी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त शिवसेनेला खिळखिळं केलं – त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सत्ता व पैशांच्या जोरावर विकत घेणारे आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन लोकांच्या भावना भडकवत आहेत, ही महाराष्ट्रद्रोहाचीच लक्षणं आहेत.
अमित शहा यांच्यावर टीका करताना अग्रलेखात त्यांना देशाच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि फुसके गृहमंत्री म्हणून हिणवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात देशातील सुरक्षा यंत्रणा ढासळली, कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आणि देशात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं, असा आरोप करण्यात आला.
विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्यात 26 हिंदू महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्यात आलं, त्या घटनेवरून ‘सामना’ने सरकारला धारेवर धरलं आहे. या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, यावरून गृहखात्याच्या निष्क्रियतेची पोलखोल करण्यात आली आहे.
‘सामना’ म्हणतो की, बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अमित शहांचा राजीनामा मागितला असता. तेच शहा महाराष्ट्रात येऊन सांगतात, “बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींना गळामिठी दिली असती” हे विधान म्हणजे बाळासाहेबांचा घोर अपमान आहे, असा घणाघात अग्रलेखातून केला गेला आहे.


Recent Comments