Newsworldmarathi Hariyana: पंचकुला जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एकाच कुटुंबातील ७ जणांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याने निराश होऊन मित्तल कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटना सेक्टर २७ मध्ये घडली. घराबाहेर उभी असलेली देहरादून पासिंग कार ही मृत्यूचा साक्षीदार ठरली. या कारमध्ये ६ जण मृतावस्थेत, तर एकजण अतिशय नाजूक अवस्थेत आढळून आला. या सातव्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यानेही अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, मित्तल कुटुंब पंचकुलामध्ये धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकून परतत असताना ही घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे.
घटनेपूर्वीचे भयाण चित्र
कारमधून दुर्गंधी येत असल्यामुळे एक स्थानिक युवक पुनीत राणाने दार उघडले असता, अंतर्गत उलटीचे निशाण, विषप्राशनाचे संकेत आणि मृतदेहांचे हालचाल नसलेले शरीर दृश्यामध्ये आलं. वाचलेली एकमेव व्यक्ती त्या क्षणी म्हणाली, “कर्जाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कोणी मदतीला आलं नाही… आता आम्ही संपलो!”
मृतांमध्ये कोण होते?
पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४१), त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि आई-वडील यांचा समावेश आहे. मित्तल कुटुंब काही वर्षांपूर्वी देहरादूनमध्ये स्थायिक झालं होतं. मात्र अलीकडे पुन्हा पंचकुलात वास्तव्यास आले होते.
पोलिसांचा संशय: आत्महत्या की हत्या?
जरी प्राथमिकदृष्ट्या हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी, पोलिसांनी हत्या करण्याचाही शक्यता वर्तवून सखोल तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सापडलेले विषाचे नमुने, टॉवेल, आणि कारमधील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.


Recent Comments