Homeबातम्याPadma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने...

Padma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित, वाचा सविस्तर…

Newsworldmarathi Delhi : नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षण, शिस्त, आणि कार्यक्षम नेतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

अशोक सराफ

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.

अच्युत पालव

देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते.

अश्विनी भिडे-देशपांडे

जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी “गांधर्व महाविद्यालयातून “संगीत विशारद” पदवी प्राप्त केली.

सुभाष शर्मा

यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत.

डॉ. विलास डांगरे

70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात.

यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments