Newsworldmarathi Pune : कोंढवे धावडे परिसरात निष्काळजीपणाने आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून एका महिलेस गंभीर दुखापत करणाऱ्या सहाय्यक फौजदाराविरोधात कारवाई करत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. २ जून रोजी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
ज्ञानेश्वर दिनकर माडीवाले, असे या सहाय्यक फौजदाराचे नाव असून ते चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २ जून रोजी ते त्यांच्या खासगी चारचाकी वाहनाने कोंढवे धावडे परिसरातून जात होते. धावडे पेट्रोल पंपासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एका पादचारी महिलेला त्यांनी जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
दारूच्या नशेत निष्काळजी वाहनचालना
प्राथमिक तपासात उघड झाले आहे की माडीवाले हे अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होते आणि त्यांनी निष्काळजीपणे व अविचाराने वाहन चालवले. या कारणास्तव त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १२५(अ), १२५(ब), २८१, तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलम ११९, १७७, १८४, १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस दलाची प्रतिमा मलीन
या घटनेनंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, प्राथमिक आढाव्यानंतर माडीवाले यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीविरोधात असून, त्यांच्याकडून झालेली कृती अशोभनीय, बेशिस्त आणि बेजबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


Recent Comments