Newsworldmarathi Pune: गोकुळनगर येथे आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत नागरिकांना परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षांत एकाधिकारशाही पद्धतीने सत्ता राबवली जात असून, सामान्य माणसाचा आवाज दडपला जात आहे. ही अन्यायकारक व्यवस्था उलथवून लावण्यासाठी क्रांतीची गरज आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कोंढवा–येवलेवाडी प्रभाग क्रमांक ४० मधील गोकुळनगर परिसरात झालेल्या या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गंगाधर विठ्ठल बंधे, सतीश मार्कड, सपना अमोल धमवट व सुरेश लक्ष्मण कवडे यांच्यासाठी प्रचार करण्यात आला. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
शिंदे म्हणाले की, पुणे शहरात सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या माध्यमातून भाजपकडून एकाधिकारशाही आणि दडपशाही सुरू असून, याला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. “भीती बाळगू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे सांगत त्यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी समन्वयक अंकुश काकडे यांनी सांगितले की, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कात्रज-कोंढवा रोड परिसरातील जनता सुज्ञ असून, यावेळी बदल घडवून आणण्याचा ठाम निर्णय नागरिकांनी घेतला आहे. दोन तृतीयांश बहुमताने संपूर्ण पॅनेल निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सभेला कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत पाटील, महिला शहराध्यक्ष स्वाती पोळके, सतीश मार्कड, अमोल धमवट, विश्वास वाघमोडे, बिभीषण खरात आदींसह गोकुळनगर व कात्रज-कोंढवा रोड परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Recent Comments