Newaworldmarathi Pune: इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तसेच लवकरच १० वीचा निकाल लागणार असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, एसईबीसी, नॉन-क्रीमीलेयर, ईडब्ल्यूएस, डोमिसाइल आदी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. निकालानंतर मोठ्या प्रमाणावर पालक व विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करत असल्याने सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या अधिक तीव्र झाली असून, त्यामुळे नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, प्रवेश प्रक्रियेच्या ऐनवेळी कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या तांत्रिक समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध दाखले शासकीय दरानुसार आणि वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरे किंवा मोहिम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक महा-ई-सेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासनमान्य दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.
विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



Recent Comments