Homeपुणेकात्रज पंपिंग स्टेशन टँकर भरणा केंद्रावरून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक व्यंकोजी...

कात्रज पंपिंग स्टेशन टँकर भरणा केंद्रावरून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक व्यंकोजी खोपडेंचा महापालिकेला जाब

Newsworldmarathi Pune कात्रज पंपिंग स्टेशन चौकात प्रस्तावित नवीन टँकर भरणा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा मुद्दा पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला. या संदर्भात नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत महापालिका प्रशासनाला थेट जाब विचारला.

Advertisements

व्यंकोजी खोपडे यांनी सांगितले की, संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत टँकर भरणा केंद्राच्या प्रस्तावित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांकडून या केंद्राला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आले. टँकरच्या सततच्या ये-जा, वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

यावर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, टँकर भरणा केंद्र उभारण्यापूर्वी वाहतूक पोलिस आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. तसेच वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेत कमी वर्दळीच्या रस्त्यालगतच हे टँकर भरणा केंद्र उभारले जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाकडून सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी भूमिका नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी सभागृहात मांडली. या विषयावर महापालिकेने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments