Newsworldmarathi Pune: पुणे शहरात १० टक्के पाणीकपात लागू असताना शाळेचे गेट धुण्यासाठी महापालिकेच्या नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी बिशप स्कूलला गेट धुण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. सूचनांचे पालन न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
युवा सेनेचे पुणे महानगराध्यक्ष हेमंत बागुल यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने संबंधित शाळेला सूचना दिल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आणि विविध संस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचा वापर आवश्यक कामांसाठी आणि योग्य पद्धतीने करणे अपेक्षित आहे. मात्र, बिशप स्कूलच्या गेटची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.
सध्या पाण्याची गरज लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा अशा प्रकारे वापर करून अपव्यय करणे योग्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे शहरात १६ ऑक्टोबर २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकात सार्वजनिक महाविद्यालयांच्या वसतिगृह व्यवस्थापकांनी पिण्याच्या पाण्याची बचत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर बिशप स्कूलने गेट धुण्यासाठी महापालिकेच्या नळाच्या पाण्याचा वापर तात्काळ थांबवावा आणि पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास लागू नियम आणि प्रचलित तरतुदींनुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Recent Comments