Homeपुणेअनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य! महेश नागरी सोसायटीच्या वतीने ममता बालसदनमध्ये...

अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य! महेश नागरी सोसायटीच्या वतीने ममता बालसदनमध्ये दिवाळी, भाऊबीज साजरी

Newsworldmarathi Pune: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र समाजातील अनाथ, वंचित आणि निराधार घटकांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या सामाजिक भावनेतून महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील ममता बालसदनमधील अनाथ मुलींसोबत दिवाळी आणि भाऊबीज उत्साहात साजरी करण्यात आली.

Advertisements

सोसायटीचे सीईओ मगाराज राठी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात बालसदनमधील मुलींना दिवाळी फराळ, मिठाई, नवीन कपडे आणि भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच फटाके, फुलांची सजावट आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. समाजातील गरजू आणि निराधार घटकांसोबत सणांचा आनंद वाटून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Advertisements

ममता बालसदनच्या सुरुवातीच्या अडचणीच्या काळापासून महेश नागरी सोसायटी संस्थेला आर्थिक मदत करत आहे. तसेच दिवाळी आणि संक्रांत हे सण मुलांसोबत साजरे करण्याची परंपराही सोसायटीने जपली आहे. १९९६ पासून संस्थेला आर्थिक मदत करण्यासह विविध सण साजरे करण्याचा उपक्रम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमावेळी बालसदनमधील एका विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘मी सात दिवसांची असताना या संस्थेत आले. तेव्हापासून मगाराज राठी आमची दिवाळी आणि माझा वाढदिवस साजरा करतात. आज मी बारावीत शिकत आहे. राठी यांच्यासारख्या व्यक्तींनी संस्थेला दिलेल्या आधारामुळे माझे आयुष्य घडले.’

यावेळी मगाराज राठी यांनी सांगितले की, दिवाळीचा खरा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता अनाथ आणि उपेक्षितांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्यात आहे.

या प्रसंगी राघव राठी, विक्रम सारडा, सचिन डागा आदी उपस्थित होते. सोसायटीच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments