Newsworldmarathi Pune: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पदपथांवरील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणे, रस्त्यालगत वाढलेली दुकाने आणि त्यामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून काल या परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.
आज सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसमवेत फर्ग्युसन कॉलेज रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. काल करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेत भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “केवळ एक दिवस कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आयुक्तांशी चर्चा करून यासंदर्भात दूरगामी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या परिसरातील एकही अतिक्रमण शिल्लक राहू नये, ही आमची भूमिका आहे.”


Recent Comments