Newsworldmarathi Pune: फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेने केलेल्या धडक कारवाईचे आम्ही स्वागत करतो. मात्र, ही कारवाई केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी व्हावी, ही अपेक्षा आहे. तसेच दुसऱ्यांची दुकाने हटवून स्वतःची दुकाने थाटण्याचा प्रयत्न तर सत्ताधारी भाजपकडून होत नाही ना, असा सवाल युवा सेनेचे पुणे महानगर प्रमुख हेमंत आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमणांनी अक्षरशः कब्जा केला आहे. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत. वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर झाली असून, पादचारी आणि वाहनचालकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणांच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मुख्य सभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत आणि कौतुक होत आहे. नागरिकांना मोकळे रस्ते आणि पदपथ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.
मात्र, या कारवाईमागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही दिवसांनी हटविण्यात आलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत ना? तसेच या जागांवर स्थानिक सत्ताधारी नगरसेवकांच्या मर्जीतील नवीन स्टॉल किंवा दुकाने उभी राहणार नाहीत ना? अशी रास्त शंका नागरिकांच्या मनात आहे.
काही दिवस अतिक्रमणे हटवून जागा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर स्वतःच्या मर्जीतील दुकानांसाठी जागा उपलब्ध करून घ्यायची, या अपेक्षेनेच ही कारवाई घडवून आणली का, असा आमचा संशय आहे. अर्थात, येणारा काळच याचे उत्तर देईल.
आमची मागणी एवढीच आहे की, फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणमुक्त झालेल्या जागांवर पुन्हा कोणत्याही प्रकारचे अनधिकृत स्टॉल, दुकाने किंवा अतिक्रमणे उभी राहू नयेत. प्रशासनाने या जागांवर नियमित लक्ष ठेवावे आणि सर्वांसाठी समान नियम लागू करावेत.
अन्यथा, दुसऱ्यांची दुकाने हटवून स्वतःची दुकाने थाटण्याचा प्रयत्न झाल्यास युवा सेना तो खपवून घेणार नाही. अशा प्रकाराला युवा सेना आपल्या पद्धतीने ठाम उत्तर देईल, याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी.
हेमंत आबा बागुल
पुणे महानगर प्रमुख
युवा सेना


Recent Comments