Newsworldmarathi Pune: वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. कामठे पाइल्स क्लिनिक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुश्रुत अवॉर्ड्स २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कोंढवा, पुणे येथे करण्यात आले. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे सहावे वर्ष असून, वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, संशोधन, रुग्णसेवा, प्रॉक्टोलॉजी तसेच आयुर्वेद क्षेत्रातील योगदान देणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालयाचे श्री. प्रतापराव जाधव यांचे शुभाशीर्वाद लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश शहा (अध्यक्ष, देसाई हॉस्पिटल, पुणे), डॉ. मीना शेख (सिनियर सर्जन), डॉ. सुनील जगताप (माजी अध्यक्ष, PDA), श्रीमती रंजना ताई टिळेकर, श्रीमती स्वप्नाली पंडित, श्रीमती वृषाली कामठे आणि श्रीमती अर्चना जगताप उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.राजेश शहा म्हणाले, आपल्याला समाजाकडून जे मिळते ते समाजाला तितक्यात चांगल्या पद्धतीने परत दिले पाहिजे. डॉ. कुणाल कामठे पाइल्स क्लिनिकच्या वतीने देशभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो हे कौतुकास्पद आहे.
आयुर्वेद ही वैज्ञानिक, संशोधनातून सिद्ध झालेली आणि प्रमाणित वैद्यकीय प्रणाली आहे. आयुर्वेदाला वैज्ञानिक वैद्यकीय प्रणाली म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी आधुनिक संशोधन, वैज्ञानिक वैधता आणि प्रभावी प्रचार आवश्यक आहे. आयुर्वेदाचा अभिमान बाळगण्यासोबतच त्यातील संशोधनाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे मत नॅशनल सुश्रुत असोसिएशन, तेलंगणाचे अध्यक्ष डॉ. एस. सारंगपाणी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात एचएम ट्रान्सपोर्टच्या शालेय बससाठी २१ प्रथमोपचार पेट्यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. व्यंकटेश जोशी म्हणाले, आयुर्वेदाबद्दल समाजात एक विशिष्ट धारणा आहे. मात्र, आयुर्वेदाची प्रगती चांगल्या दिशेने होत आहे. आजचा आयुर्वेद हा पूर्वीपेक्षा वेगळा आणि अधिक प्रगत आहे. अनेक आव्हानांना सामोरे जात, मेहनत घेत केलेल्या कार्याचे फळ आज दिसत आहे. पूर्वी रक्तदाब तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागत असे; मात्र आज बारावी उत्तीर्ण व्यक्तीदेखील रक्तदाब तपासू शकते. आयुर्वेदाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. आयुर्वेद शरीरासोबतच आध्यात्मिक आणि भावनिक स्तरावरही कार्य करतो. त्यामुळे आयुर्वेदाचा योग्य वापर आणि त्याचा व्यापक प्रचार करणे गरजेचे आहे.
या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार नॅशनल सुश्रुत असोसिएशन, तेलंगणाचे अध्यक्ष डॉ. एस. सारंगपाणी आणि डॉ. जोशीज होलिस्टिक मल्टिस्पेशालिटी क्लिनिक, मुंबईचे संचालक डॉ. व्यंकटेश जोशी यांना प्रदान करण्यात आला.
सुश्रुत रत्न पुरस्कार अग्निकर्म तज्ज्ञ डॉ. उदय तळहर, अ.भा.आ.सं., नवी दिल्ली येथील शल्य तंत्र विभागाचे प्रमुख डॉ. योगेश बडवे आणि श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय संचालक डॉ. आबासाहेब गडदे यांना देण्यात आला.
प्रोक्टोलॉजी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई येथील शल्य तंत्र विभागाचे उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. अमरप्रकाश द्विवेदी आणि इंटरनल मेडिसिन अँड पाइल्स हॉस्पिटल, लखनौचे डॉ. संजीत साहू यांचा गौरव करण्यात आला.
आयुर्वेद आयकॉन पुरस्कार बी.एस.डी.टी. आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्राध्यापक डॉ. रेणुका गायळ आणि ओजस आयुर्वेद सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगावचे संचालक डॉ. महेश बिर्ला यांना प्रदान करण्यात आला. कोंढवा गौरव पुरस्कार वरिष्ठ चिकित्सक डॉ. कृष्णकुमार बैकर आणि वरिष्ठ चिकित्सक डॉ. विजय जाधव यांना देण्यात आला. आशिष जरड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्मिला कामठे यांनी आभार मानले.


Recent Comments