वडगाव जलकेंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद
पुणे : वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन नवीन ‘किओस्क’ बसविण्याच्या कामामुळे वडगाव जलकेंद्राअंतर्गत येणाऱ्या अनेक भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी (१२ फेब्रुवारी) पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. तसेच शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगणे, आनंदनगर, वडगाव धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग दोन, आंबेडकरनगर, टिळकनगर तसेच दाते बस स्टॉप परिसरातील राजीव गांधी पंपिंग अंतर्गत सच्चाई माता टाकी, संतोष नगर, आंबेगाव खुर्द, सुंदा मातानगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारतनगर आणि येवलेवाडी या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात म्हाडाची ३ हजार घरांची नवी लॉटरी
Newaworldmarathi Pune : हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा आनंदाची घोषणा केली असून, सध्या सुरू असलेल्या ४१८४ घरांच्या सोडतीनंतर येत्या मार्चमध्ये आणखी ३ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षांत २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून सुमारे २५ हजार घरे उपलब्ध करून दिल्याची माहिती मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
खासगी विकासकांकडून जादा शुल्क आकारल्याच्या तक्रारींवर कारवाई करत वाढीव रक्कम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले असून, विजेत्यांना ५० टक्के पार्किंग अनिवार्य राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. चंदनगर-खराडी येथील १५ गुंठे जमीन अतिक्रमणमुक्त करून म्हाडाच्या ताब्यात देण्यात आली आहे. ‘आयएचएलएमएस २.०’ प्रणालीद्वारे विजेत्यांनी मुदतीत घराचा स्वीकार किंवा नकार नोंदवणे आवश्यक असून, उर्वरित घरे ‘बुक माय होम’ पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध राहणार आहेत.
पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी?
Newaworldmarathi Mumbai: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आले असून, राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बुधवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. निर्णयक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज व्यक्त होत असताना, आगामी २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार करून पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने देशव्यापी दौरे करणे मर्यादित ठरू शकते, अशी चर्चा पक्षांतर्गत आहे.
तथापि, पार्थ पवार यांचा प्रभाव सध्या मर्यादित असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. २०१९ मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना अपयश आले होते. मध्यंतरी एका बिगरमराठी नेत्याचे नाव चर्चेत आले होते; परंतु आमदार व कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर तो पर्याय मागे पडल्याचे सांगितले जाते.
सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार असून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत आहे. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना राज्यसभेतून संधी देण्याचाही पर्याय चर्चेत आहे. मात्र, त्यांना दीर्घ कार्यकाळ असलेल्या जागेवरून राष्ट्रीय राजकारणात पाठविण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पक्षातील ३० ते ३५ आमदार व विविध आघाड्यांचे पदाधिकारी सुनेत्रा पवार यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी भूमिका मांडत असले तरी अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेतही ‘महिलाराज’; ७३ पैकी ४२ महिला सदस्य
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांनंतर पुणे जिल्हा परिषदेत यंदा प्रथमच ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे. बदलत्या आरक्षण रचनेमुळे अनेक ज्येष्ठ सदस्यांना संधी न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना रिंगणात उतरविण्यात आले, तर आरक्षित प्रवर्गामुळे नव्या महिलांनाही संधी मिळाली. परिणामी ७३ गटांपैकी तब्बल ४२ महिला सदस्य निवडून आल्या असून ३१ पुरुष सदस्य विजयी झाले आहेत.
जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांपैकी चार ठिकाणी नगराध्यक्षपद महिलांकडे गेले आहे. वडगाव, देहू आणि मंचर या नगरपंचायतींमध्येही अध्यक्षपदाची धुरा महिलांकडे सोपविण्यात आली आहे. पुणे महापालिकेतही महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली असून पंचायत समित्यांमध्ये जुन्नर, शिरूर, मावळ, राजगड आणि खेड येथे सभापतिपदासाठी महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे.
तालुकानिहाय पाहता इंदापूर आणि जुन्नर येथे सर्वाधिक महिला सदस्य निवडून आल्या आहेत. इंदापूरमध्ये माजी सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. जुन्नरमध्ये सहाही सदस्या नवख्या असून, देवराम लांडे यांची सून मोनाली लांडे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. बारामती आणि खेड येथे प्रत्येकी चार महिला सदस्य विजयी झाल्या आहेत. खेडमध्ये ज्येष्ठ नेते शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे, विनया मुंगसे आणि रूपाली कोंडे या पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत प्रवेश करीत आहेत.
महिलांची वाढती उपस्थिती ही केवळ आरक्षणाचा परिणाम नसून स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचे द्योतक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी पदाधिकारी निवडीतही महिलांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जास मंजुरी
पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जास मंजुरी
पुणे : पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा वेग दिला असून ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ‘हुडको’ या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासह त्यासाठी राज्य सरकारने हमी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत भूसंपादनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्ज प्रस्तावाला मंजुरी देत विमानतळाच्या कामांना गती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जाची परतफेड विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही)मार्फत केली जाणार असून यात एमआयडीसी, एमएडीसी, सिडको आदी संस्थांचा सहभाग असेल.
विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमीन आवश्यक असून पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यापैकी सुमारे २ हजार ८०० एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. भूसंपादन आणि वित्तपुरवठ्याच्या निर्णयामुळे पुरंदर विमानतळ प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेला निर्णायक कलाटणी मिळाली आहे
राज्यात ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती -मुख्यमंत्री
मुंबई, दि. ९ : राज्यातील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच नव्या पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार असून, सुमारे ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५० हजार, तर आयोगाबाहेरील जवळपास २० हजार पदांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. भरती करताना आवश्यक कौशल्ये, पात्रता, सेवा प्रवेश आणि कामाच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्य प्रशासनात मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा प्रवेश नियमावलीतील सुधारणा लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाची भूमिका केवळ औपचारिक नसून, संपूर्ण भरती व्यवस्थेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा घटक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, विलंब आणि गैरसोयी टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल पडताळणी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. डिजीलॉकर आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!
Newsworldmarathi Pune: इंदापूर तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल एक हजार एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते.
इंदापूर तालुक्यासाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत उभारण्याचे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिले होते. या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. इंदापूरचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दिवंगत अजित पवार यांच्याकडे यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
या निर्णयामुळे इंदापूर, बारामती तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, स्थानिक उद्योजकतेला बळ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे चैतन्य प्राप्त होईल. औद्योगिक विकासाच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक निर्णायक टप्पा गाठला असून, इंदापूर लवकरच नव्या उद्योगांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमली पदार्थ विरोधी लढा सर्वसमावेशक व्हावा : शारदा राऊत
Newaworldmarathi Pune: अमली पदार्थ राक्षस आता अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला असून हा शत्रू दिसत नसल्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर आहे. पूर्वी तरुण पिढीला लक्ष्य करणारा हा राक्षस आता शालेय पिढीला लक्ष करत आहे त्यामुळे या विरोधात लढण्यासाठी पोलीस, प्रशासन, प्रसार माध्यमे, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्था, पालक ,शिक्षक, समुपदेशक, मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या लढायला आता व्यापक स्वरूप येण्यासाठी तो सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ,भोई प्रतिष्ठान आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी या दृष्टी ने समाजासमोर स्तुत्य आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अशा वाटचालीत नेहमीच अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भोई प्रतिष्ठान पुणे , महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने से नो टू ड्रग्स अँड से येस टू लाइफ या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .त्याच्या उद्घाटन प्रसंगी शारदा राऊत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की या प्रश्नावर लढण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे आणि या दृष्टीने ही कार्यशाळा पथदर्शी प्रकल्प ठरेल.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री अभिराम घड्याळ पाटील , भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई, जाधवर इन्स्टिट्यूट चे प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दुल जाधवर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड प्रताप परदेशी, जेष्ठ समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवारांच्या नातीचं, रेवती सुळेचं ठरलं लग्न !
Newaworldmarathi Pune:शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं, रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. यामुळे पवार आणि सुळे कुटुंबात अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्यावर चहूकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने, सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
राष्ट्ववादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नात, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचा विवाह निश्चित झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मैत्रीणीने ही गुड न्यूज जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली. रेवती आणि सारंग या दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत स्मृती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचही त्यांनी अभिनंदन केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंग अरूण लखानी हे नागपूरचे आहेत, त्यामुळे रेवती सुळे या नागपूरच्या सूनबाई होणार आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे लग्न ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुळे व पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विद्यार्थी काँग्रेसच्या राज्य महासचिव पदी ॲड.कृष्णा साठे यांची निवड
Newaworldmarathi Pune : काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआय (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) अर्थात विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी ॲड.कृष्णा साठे यांची निवड करण्यात आली आहे. ॲड.साठे हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीत सातत्याने आणि सक्रियपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षणाशी संबंधित प्रश्न, परीक्षा, फी वाढ, वसतिगृह, शिष्यवृत्ती, तसेच अन्य मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.
विद्यार्थी प्रश्नांवर अनेक आंदोलने केली व प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी एनएसयुआय पुणे शहर व जिल्हा महासचिव म्हणून जबाबदारी पाहिली आहे. तसेच, पालघर जिल्हा एनएसयुआय प्रभारी म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणी करत विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या विचारधारेशी जोडण्याचे काम केले आहे. राज्य महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्य आणि केंद्रातील भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात एनएसयुआयच्या माध्यमातून तीव्र संघर्ष केला जाईल. काँग्रेस पक्षाची विचारधारा, संविधानिक मूल्ये, समता, न्याय व लोकशाहीचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ताकदीने व निष्ठेने काम करत राहीन.ॲड. कृष्णा साठे महासचिव, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय

