‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने ती उजळून निघाली आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात आले आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात आली आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा ‘‘श्रीगणेशा’’

Newsworldmarathi Pimpri: उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता देशातील नामांकित भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM-नागपूर) ची शाखा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वत्र गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकीत संस्था सुरू करण्याचा ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील देत ७० एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा हा ‘‘ड्रीम प्रोजेक्ट’’ आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहरातील मोशी येथील गट क्रमांक ३२५ मधील शासकीय गायरान जमिनीवर आयआयएमची शाखा उभारली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडच्या लौकीकात आणखी भर पडणार असून, औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. याआधी त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा सुरू करण्यासाठी आमदार लांडगे पुढाकार घेतला होता आणि त्याला यश मिळाले. आता आयआयएम-नागपूरची शाखा सुरू करण्याचे स्वप्न साकार होत आहे. औद्योगिक नगरीत आयआयएमची शाखा सुरू झाल्यास रोजगार, संशोधन आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होतील. देशभरातील विद्यार्थी पिंपरी-चिंचवडमध्ये येतील, उद्योगजगताशी थेट संपर्क साधला जाईल आणि शहराची शैक्षणिक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
“पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आयआयएमसारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती. आता महसूल मंत्री यांनी जागेला मान्यता दिली आहे. IIM चे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांनी पुढाकार घेतला आहे. आता ‘आयआयएम’ च्या कामाला आता गती मिळेल.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

लहानग्यांनी साकारली सर्वांगसुंदर ‘बाप्पा’ची मूर्ती; हर्षाली माथवड यांचा पुढाकार

Newsworldmarathi Pune: स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार, रंग देत लहानग्यांनी शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजिली होती. कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने कोथरूडमधील डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडविण्याची कला शिकवली. गणेश मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली. कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण, स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या तिन्हींचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला. “गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे. कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्कारांची शिकवण मिळाली. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन,” अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली.

अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

0
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर ७ पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहर्तावर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.’’ प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे.
– पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व इंद्राणी बालन फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

Newsworldmarathi Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मिळणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रंगारी गणपती ट्रस्ट आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रामुख्याने गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे. या वर्षीही दि. २८ ऑगस्ट ते दि. ५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळीत हे आरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिरात सीबीसी, कोलेस्टोरॉल, क्रेटिन, एसजीओटी, एसजीपीटी, आरबीएस, ब्लड, युरिन, बिलीरुबिन अशा महत्वाच्या तपासण्या होणार आहेत. या तपासण्याचे अहवालही मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिरासाठी गणेशभक्त थेट आरोग्य शिबीरस्थळी नाव नोंदवून तपासणी करू शकतात तसेच अधिदेखील ऑनलाईन पद्धतीने नाव रजिस्टर करून आपले नाव नोंदवू शकतात, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक – https://bit.ly/Aarogyashibir
भक्तांना चांगलं आरोग्य लाभावं, हा आपल्या अध्यात्माचा पाया आहे. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविक-भक्तांसाठीही चांगलं आरोग्य लाभावं या हेतूने ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने अध्यात्मिक उत्सवात आरोग्योत्सवाचा जागर करण्याचा निर्णय आम्ही घेतला. अधिकाधिक गणेश भक्तांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, ही विनंती!
पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

ड्रीम युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन स्वच्छता अभियान ग्रुपच्या देशी वृक्षाची लागवड

0
Newsworldmarathi Pune: पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भव्य पाऊल उचलत शिंदवणे घाट परिसरात २२०० देशी वृक्षांची सामूहिक लागवड करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. महाराष्ट्र राज्य वन विभाग, ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, द फॉरवर्ड फाउंडेशन आणि ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सौजन्य ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तर नियोजन द फॉरवर्ड फाउंडेशनने केले. या वृक्ष लागवडीच्या संवर्धनाची जबाबदारी ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन पार पाडणार आहे. या उपक्रमात प्रमोद रासकर (वन संरक्षक), ऑल स्टेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सामाजिक दायित्व विभागाच्या प्रमुख सीमा सुमन, प्रा. के. डी. कांचन, ऋतुजा कांचन सरपंच (उरुळी कांचन), सुदर्शन चौधरी (पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक), अलंकार कांचन, मयूर कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सौ. शोभा महाडीक (सरपंच शिंदवणे), शिवाजी महाडीक, जगदीश महाडीक, विद्याताई यादव, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक, संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, तसेच शिंदवणे, उरुळीकांचन ग्रामपंचायतींचे कर्मचारी वृंद आणि सागर बाळासाहेब कांचन यांची यंत्र सामुग्री असा उत्साहात सहभाग नोंदविला. या हरित महायज्ञात ५०० हून अधिक पर्यावरणप्रेमींनी घाम गाळत सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक लोकसहभागातून उभारलेले हे हरित पाऊल भविष्यात शिंदवणे घाट परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी सुनील माने यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेश सरचिटणीस तसेच प्रवक्ता म्हणून काम केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या सूचनेनुसार तसेच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता मा.आ.जितेंद्र आव्हाड यांनी सुनील माने यांची फेरनिवड केली आहे. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी ही निवड घोषित केली आहे.

पुण्यात आर. एम. धारीवाल फाऊंडेशनचे वृक्ष पुनर्रोपण अभियान

0
Newsworldmarathi Pune: विकासकामांच्या निमित्ताने झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असताना, आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने झाडांना दुसरे जीवन देण्यासाठी वृक्ष पुनर्रोपण अभियान हाती घेतले आहे. गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि आपत्ती निवारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनने आतापर्यंत ५० हून अधिक संस्थांच्या माध्यमातून असंख्य नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवला आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या पुढाकाराने हा हरित उपक्रम सुरू करण्यात आला आहे. परिपक्व झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करून नवजीवन देण्याचे ध्येय या अभियानामागे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगरपालिका (PMC) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. दररोज रस्ते व इतर विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याने पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एक परिपक्व झाड चार व्यक्तींना पुरेसा प्राणवायू पुरवते, तसेच वर्षाला १० ते ४० किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. काळजीपूर्वक प्रत्यारोपण केल्यास ८० टक्के झाडे यशस्वीपणे जिवंत राहतात, असा अनुभव फाऊंडेशनने नोंदवला आहे. आत्तापर्यंत पुणे रिंग रोड, मुंढवा, घोरपडी आणि बी. जी. शिर्के रोड परिसरात २१०० हून अधिक परिपक्व झाडांचे पुनर्रोपण करण्यात यश आले आहे. मात्र, आगामी १७२ किमी लांबीच्या पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे हजारो झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सामाजिक संस्था, कंपन्या व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन फाऊंडेशनने केले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना विविध मार्ग खुले आहेत. झाडांच्या पुनर्रोपणासाठी निधी दान करता येईल, एका झाडाचे दोन वर्षांसाठी दत्तक प्रायोजकत्व घेता येईल किंवा झाडांसाठी जागा उपलब्ध करून देता येईल. तसेच या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून हरित चळवळीला बळकटी देता येईल. “विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे नेता येईल,” असा संदेश देत आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने नागरिकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी : [www.rmdfoundation.org.in/tree-transplantation](http://www.rmdfoundation.org.in/tree-transplantation) 👉 वृक्ष पुनर्रोपण अभियानात सहभागी व्हा आणि उद्याचे भविष्य सुरक्षित करा.

गुंतागुंतीच्या प्रभागरचनेने प्रशासनालाही डोकेदुखी; एका प्रभागात खासदार, चार आमदार; सीमारेषा अस्पष्ट

0
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेत मोठी गफलत झाल्याचे चित्र समोर आले आहे. एका प्रभागाच्या हद्दीत दोन ते चार विधानसभा मतदारसंघ आणि तितकीच क्षेत्रीय कार्यालये जोडली गेल्याने नागरिक व प्रशासकीय यंत्रणा गोंधळून गेली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ (पुणे स्टेशन-जयजवाननगर) मध्ये तर तब्बल चार विधानसभा मतदारसंघ आणि चार क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानासाठी सोयीस्कर व सुबोध रचना करण्याऐवजी, भौगोलिक सीमांचा विचार न करता प्रभाग आखणी केली गेल्याचे स्पष्ट होत आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अस्तित्वात असलेल्या जुन्या प्रभागांचे अक्षरशः तुकडे करून आजूबाजूच्या प्रभागांत मिसळण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या प्रभागाची हद्द व त्याचा मतदारसंघ कोणता हे ओळखणे अवघड झाले आहे. डोंगर, टेकड्या, नाले, नद्या व राष्ट्रीय महामार्ग या नैसर्गिक व भूगोलिक सीमांचा विचारही प्रभाग आखणी करताना पाळला गेला नाही. यामुळे एका प्रभागात विविध भागांचा कृत्रिम संगम झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ या स्टेशन-जयजवाननगर प्रभागात पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, कसबा व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर ढोले पाटील, येरवडा, विश्रामबागवाडा व घोले रोड अशी चार क्षेत्रीय कार्यालये या प्रभागात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर या कार्यालयांचा ताळमेळ साधणे कठीण ठरणार आहे. त्यातच या प्रभागाच्या हद्दीत बंडगार्डन, कोरेगाव पार्क, फरासखाना, समर्थ पोलिस व येरवडा अशी पाच पोलिस ठाणी आहेत. एक खासदार व चार आमदारांचा समावेश असल्याने या प्रभागात राजकीय व प्रशासकीय गुंतागुंत अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे एका प्रभागाच्या सीमारेषेत अनेक विधानसभा, अनेक कार्यालये व पोलिस ठाणी एकत्र आल्याने नागरिकांची गफलत वाढली आहे. मतदारांना नेमके आपले मतदान केंद्र कोणत्या हद्दीत येते, हे समजणे कठीण होणार आहे. प्रभाग रचनेतील या विसंगतींमुळे प्रशासनालाही निवडणूक व्यवस्थापनात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे प्रभाग रचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. सुबक, सुटसुटीत व पारदर्शक प्रभाग रचनेच्या अपेक्षा असताना, गोंधळलेली व गुंतागुंतीची आखणी पुढील काळात निवडणूक प्रक्रियेत मोठे संकट ठरू शकते.

पर्युषण पर्वानिमित्त ‘भगवान महावीरांच्या पाच पाळण्या’च्या दर्शनाची संधी

0
Newsworldmarathi Pune: जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण पर्वानिमित्त पुण्यातील भाविकांना भगवान महावीर यांच्या पाच पाळण्यांचे एकत्र दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सुजय गार्डन येथील जयंत शहा यांच्या निवासस्थानी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाळणे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील भगवान महावीरांचे पाळणे सजवून भाविक दर्शनासाठी घरी घेऊन जातात. यंदा श्री गोडजी मंदिर, कात्रज मंदिर, सुजय गार्डन मंदिर, लेक टाऊन मंदिर आणि पद्मावती नगर मंदिर येथील पाळणे एकत्र आणून दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. २०१५ साली सात पाळण्यांचे असेच एकत्र दर्शन घडले होते. यंदा पुन्हा अशाच पद्धतीने २५, २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाच पाळण्यांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली असून त्यात भजन, भावगीते, तसेच आचार्य आणि गुरु महाराजांचे प्रवचन यांचा समावेश आहे. दर्शनासाठी सर्व भाविकांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “भगवान महावीर जयंती आणि पाळणे याला जैन समाजात विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांना एकाच ठिकाणी अनेक मंदिरांतील पाळण्यांचे दर्शन घेता येईल. हा उपक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक समाधान देणारा ठरेल.”