पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेत मोठी गफलत झाल्याचे चित्र समोर आले आहे. एका प्रभागाच्या हद्दीत दोन ते चार विधानसभा मतदारसंघ आणि तितकीच क्षेत्रीय कार्यालये जोडली गेल्याने नागरिक व प्रशासकीय यंत्रणा गोंधळून गेली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ (पुणे स्टेशन-जयजवाननगर) मध्ये तर तब्बल चार विधानसभा मतदारसंघ आणि चार क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मतदानासाठी सोयीस्कर व सुबोध रचना करण्याऐवजी, भौगोलिक सीमांचा विचार न करता प्रभाग आखणी केली गेल्याचे स्पष्ट होत आहे.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अस्तित्वात असलेल्या जुन्या प्रभागांचे अक्षरशः तुकडे करून आजूबाजूच्या प्रभागांत मिसळण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या प्रभागाची हद्द व त्याचा मतदारसंघ कोणता हे ओळखणे अवघड झाले आहे. डोंगर, टेकड्या, नाले, नद्या व राष्ट्रीय महामार्ग या नैसर्गिक व भूगोलिक सीमांचा विचारही प्रभाग आखणी करताना पाळला गेला नाही. यामुळे एका प्रभागात विविध भागांचा कृत्रिम संगम झाला आहे.
प्रभाग क्रमांक १३ या स्टेशन-जयजवाननगर प्रभागात पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, कसबा व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर ढोले पाटील, येरवडा, विश्रामबागवाडा व घोले रोड अशी चार क्षेत्रीय कार्यालये या प्रभागात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर या कार्यालयांचा ताळमेळ साधणे कठीण ठरणार आहे. त्यातच या प्रभागाच्या हद्दीत बंडगार्डन, कोरेगाव पार्क, फरासखाना, समर्थ पोलिस व येरवडा अशी पाच पोलिस ठाणी आहेत. एक खासदार व चार आमदारांचा समावेश असल्याने या प्रभागात राजकीय व प्रशासकीय गुंतागुंत अधिक वाढण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे एका प्रभागाच्या सीमारेषेत अनेक विधानसभा, अनेक कार्यालये व पोलिस ठाणी एकत्र आल्याने नागरिकांची गफलत वाढली आहे. मतदारांना नेमके आपले मतदान केंद्र कोणत्या हद्दीत येते, हे समजणे कठीण होणार आहे. प्रभाग रचनेतील या विसंगतींमुळे प्रशासनालाही निवडणूक व्यवस्थापनात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
यामुळे प्रभाग रचनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. सुबक, सुटसुटीत व पारदर्शक प्रभाग रचनेच्या अपेक्षा असताना, गोंधळलेली व गुंतागुंतीची आखणी पुढील काळात निवडणूक प्रक्रियेत मोठे संकट ठरू शकते.


Recent Comments