चंद्रकांत पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त कोथरुडकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.
यंदाच्या १६ ॲागस्ट रोजी या ग्राहक पेठेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १९ आणि २० ॲागस्ट रोजी कर्वे रोड येथील हर्षल हॅाल येथे दोन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी १५ टक्के आणि समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या सभासदांना ३० टक्के सवलतीच्या दरात खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून उपलब्ध करुन देण्यात आली.
या महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत, धान्य खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास २० हजार नागरिकांनी धान्य खरेदी केली. आगामी काळात ही कोथरुडकरांसाठी अशा पद्धतीचा धान्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. पाटील यांनी यानिमित्ताने केली.
पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी; केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश
Newsworldmarathi Pune: पुणे-लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठी सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रकल्पाच्या दोन्ही मार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात असलेली मागणी आता पूर्णत्वास जात आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याला मंजुरी दिल्याने पुणेकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान करणार असून यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. तसेच पाठपुरावाही केला होता. आता राज्य सरकारच्या मंजुरीमुळे या दोन्ही मार्गीकांचा मार्ग मोकळा झाला असून यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत रेल्वेचे आधुनिकीकरण आणि मार्गांचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारले असून आवश्यक तेथे मार्गिकांची संख्याही वाढवली जात आहे. अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात अशा कामांनी आणखी वेग आलेला आहे. पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिसरी आणि चौथी मार्गीका झाल्यास यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे’.
‘या दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार असून मालगाड्यांमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच एक्सप्रेस गाड्यांचा वेगदेखील वाढणार आहे. याचा फायदा औद्योगिक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे, असेही सांगत मोहोळ यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद केले असूम या प्रकल्पाची पुढील प्रक्रियाही वेगाने होईल आणि सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
यूकेमध्ये विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या उभारणीसाठी राहुल कराड यांचे ५० लाखाचे योगदान
Newsworldmarathi Pune : मी यूकेमध्ये पहिल्यांदाच विठ्ठल-रुख्मिणी मंदिर उभारण्याच्या पवित्र कार्याला भारतातील नामांकित शिक्षणसंस्था एमआयटी (MIT) चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी मोठे पाठबळ दिले आहे. त्यांनी या मंदिराच्या बांधकामासाठी तब्बल ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली असून, त्यांच्या या दातृत्वामुळे हा ऐतिहासिक प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जाणार आहे.
या मंदिराची स्थापना करण्यासाठी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका विशेषरीत्या यूकेपर्यंत आणण्यात आल्या आहेत. या पादुकांचे पंढरपूर ते लंडन असे पदयात्रा व पूजेसह प्रस्थान करण्यात आले, ज्याचे आयोजन व वाहून नेण्याचे कार्य श्री. अनिल खेडकर यांनी केले. हे कार्य मंदिराच्या पवित्रतेचे आणि भक्तिभावाचे प्रतीक मानले जात आहे.
या मंदिराच्या उभारणीमुळे यूकेतील वारकरी, भक्त आणि भारतीय संस्कृतीप्रेमींसाठी एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र निर्माण होणार आहे. या प्रसंगी मंदिर समितीने राहुल कराड यांचे मन:पूर्वक आभार मानले असून, त्यांच्या या योगदानामुळे भविष्यात अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिहंडी होणार डिजे मुक्त साजरी
Newsworldmarathi Pune: शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिंहडी यंदा डिजे मुक्त साजरी केली जाणार आहे. डिजे न लावता पारंपारिक ढोल ताशांसह प्रभात बॅन्ड, मुंबईतील नामांकित वरळी बिट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहिहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.
छत्रपती शिवाजी रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल चौकात गतवर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. प्रामुख्याने चौक चौकात होणार्या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी बालन यांनी या संयुक्त दहिहंडीसाठी पुढाकार घेतला होता. त्याला प्रतिसाद देत पहिल्याच वर्षी 35 मंडळांनी एकत्र संयुक्त दहिहंडी साजरी केली होती. आता पुन्हा सलग दुसर्यावर्षी ही संयुक्त दहिहंडी साजरी केली जाणार आहे. मात्र, यावर्षी पुनीत बालन यांनी डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या दहिहंडीत उत्सवातही डिजे न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा पारंपारिक वाद्यांच्या गजरात दहिहंडी फोडली जाणार आहे.
त्यानुसार दहिहंडीला सुरवातीला युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल वादन होणार आहे, त्यानंतर प्रभात बॅन्डचे वादन होणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रसिध्द बँजो वरळी बिट्स यांच्या संगीत तालावर दहिहंडी फोडली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उज्जन येथील पारंपारिक शिव महाकाल या कार्यक्रम यावेळी होणार असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.
संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे
– श्रीमंत पेशवे गणपती मंदिर
– श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
– श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
– श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
– पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती
– श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड)
– उदय तरुण मंडळ (एफसी रोड)
– नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट
– मंजुबा तरुण मंडळ (पीएमसी)
– फणी आळी तालीम ट्रस्ट
– प्रकाश मित्र मंडळ
– भरत मित्र मंडळ
– त्वष्टा कासार समाज संस्था
– आझाद हिंद मंडळ (जे.एम रोड)
– श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव
– श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठाण
– जनता जर्नादन मंडळ प्रतिष्ठान
– जनता जनार्दन मंडळ
– क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळ
– गणेश मित्र मंडळ (अलका चौक)
– भोईराज मित्र मंडळ
– शिवतेज ग्रुप
– नटराज ग्रुप
त्यानुसार दहिहंडीला सुरवातीला युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल वादन होणार आहे, त्यानंतर प्रभात बॅन्डचे वादन होणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रसिध्द बँजो वरळी बिट्स यांच्या संगीत तालावर दहिहंडी फोडली जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उज्जन येथील पारंपारिक शिव महाकाल या कार्यक्रम यावेळी होणार असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.
संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे
– श्रीमंत पेशवे गणपती मंदिर
– श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
– श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
– श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
– पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती
– श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड)
– उदय तरुण मंडळ (एफसी रोड)
– नागनाथ पार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट
– मंजुबा तरुण मंडळ (पीएमसी)
– फणी आळी तालीम ट्रस्ट
– प्रकाश मित्र मंडळ
– भरत मित्र मंडळ
– त्वष्टा कासार समाज संस्था
– आझाद हिंद मंडळ (जे.एम रोड)
– श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव
– श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठाण
– जनता जर्नादन मंडळ प्रतिष्ठान
– जनता जनार्दन मंडळ
– क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळ
– गणेश मित्र मंडळ (अलका चौक)
– भोईराज मित्र मंडळ
– शिवतेज ग्रुप
– नटराज ग्रुप मुंबईत गाजला प्रवासी राजस्थानचा सांस्कृतिक महोत्सव
Newsworldmarathi Pune: राजस्थान प्रवासी फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रवासी राजस्थान सांस्कृतिक सोहळा २०२५” मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हजारो राजस्थानी प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थानच्या पोकरणचे आमदार महंत प्रतापपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानसिंह पीलवा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
या सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, मंत्री मदन दिलावर, जोराराम कुमावत, ओटाराम देवासी, आमदार नरेंद्र मेहता, दीप्ती किरण महेश्वरी, महेन्द्र काबरा, मेघराज धाकड, पूनम कुलरिया यांचा समावेश होता. तसेच पुणे समस्थ राजस्थानी संघाचे अध्यक्ष मगराज राठी, रतनसिंह तुरा, खेतसिंह मेडत्या यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे राजस्थानच्या परंपरा, वेशभूषा, लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नृत्य, लोकगीत आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर उपस्थितांनी रंगून जाऊन आनंद लुटला. या सोहळ्याद्वारे परदेशात आणि देशाच्या विविध भागांत स्थायिक झालेल्या राजस्थानी समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी राजस्थान प्रवासी फाउंडेशनची “प्रवासी संबल योजना” सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देश-विदेशातील गरजू राजस्थानी प्रवाशांना मदत व मार्गदर्शन देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी पूनम कुलरिया यांनी तब्बल ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांनी फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची ग्वाही दिली. आभार प्रदर्शन फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती चारण यांनी करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हा सांस्कृतिक सोहळा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, राजस्थानी समाजाच्या एकात्मतेचा, सांस्कृतिक जतनाचा आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम ठरला.
फेडरल बँक पुणे व्दितीय मॅरेथॉनचे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी मिलिंद सोमन यांच्या उपस्थितीत आयोजन
Newsworldmarathi Pune: बहुप्रतिक्षित फेडरल बँक पुणे मॅरेथॉनाचा व्दितीय आविष्कार रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणेकरांच्या भेटीसाठी पुन्हा येत आहे. भारताच्या वाढत्या फिटनेस नकाशावर पुण्याने या मॅरेथॉनच्या माध्यमातून आता आपले स्थान पक्के केले आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे धावपटू या मॅरेथॉनसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइट https://stridersevents.in/events/info?FederalBankPuneMarathon2025= द्वारे आपली ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण हे फेडरल बँक पुणे मॅरेथॉनचा चेहरा असणार आहेत. या मॅरेथॉनद्वारे सर्व वयोगटातील व्यक्तींना आरोग्य, चिकाटी आणि समावेशक सहभागासाठी प्रोत्साहीत केले जाणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत विविध शर्यतींच्या गटांसाठी एकूण ११ लाख रूपयांची बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. मॅरेथॉनची नावनोंदणी आता सुरू झाली असून प्रवेश शुल्क खालीलप्रमाणे आहे:
मॅरेथॉन (42.2 किमी): 950 रुपये + जीएसटी
अर्ध मॅरेथॉन (21.1 किमी): 900 रुपये + जीएसटी
10 किमी शर्यत: 750 रुपये + जीएसटी
5 किमी शर्यत: 600 रुपये + जीएसटी
या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या गणवेशधारी सेवेतील जवानांना मानवंदना म्हणून, लष्करी जवान तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी नोंदणीशुल्क आकारले जाणार नाही.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आयोजित फेडरल बँक पुणे मॅरेथॉन ही भारतातील सर्वाधिक सर्वसमावेशक मॅरेथॉनपैकी एक आहे. या मॅरेथॉनमध्ये इतरांसोबत धावण्यासाठी विशेष क्षमता असलेल्या सहभागींचे स्वागत करण्यात येत आहे. या आगळ्यावेगळ्या मोहिमेचे नेतृत्व मिलिंद सोमण करतील. या स्पर्धेच्या ४२.२ किमी मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन आणि इतर शर्यती या तीन मुख्य गटांमध्ये ३००० हून अधिक धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पूर्ण किंवा अर्ध मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या धावपटूंना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी फिनिशर पदकाने सन्मानित केले जाणार आहे आणि या पदकाच्या रुपाने या मॅरेथॉनच्या स्मृती कायम त्यांच्या मनात दरवळत राहतील.
फेडरल बँकेचे सीएमओ एम व्ही एस मूर्ती म्हणाले, “आर्थिक असो अथवा शारीरिक प्रवास असो, अशा उद्देशपूर्ण प्रवासाला अधिकाधिक शक्ती प्रदान करणे, ही फेडरल बँकेची कायम धारणा राहिलेली आहे. धावणे हे जीवनाचे एक गमक आहे. ते तयारी, चिकाटी आणि उत्कटता या गुणांना नेहमीच बक्षीस देते. फेडरल बँक पुणे मॅरेथॉनमध्ये या तिन्ही गुणांचा समावेश आहे, परंतु त्याला असल्ल पुणेरी भावनेची जोड मिळालेली आहे. मिलिंद सोमण या उपक्रमाचा एक चेहरा म्हणून सर्वांसमोर प्रतिनिधीत्व करत असल्याने, २३ नोव्हेंबर रोजी होणारी ही व्दितीय मॅरेथॉन आणखी मनोरंजक बनणार आहे. शब्दशः तसेच जीवनाचे एक रुप अशा दृष्टीने प्रेरित करणाऱ्या कारणासाठी एकत्र येण्यास आम्हाला हा उपक्रम पुन्हापुन्हा प्रेरणा देत आहे.”
स्ट्रायडर्सचे संचालक प्रफुल्ल उचील (Uchil) म्हणाले, “गेल्या वर्षी या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ सहभागी व्यक्तींची संख्याच नव्हे तर ऊर्जा, उत्साह आणि पुणे शहर सज्ज आहे, हा विश्वास केवळ शर्यतीसाठी नव्हे तर एका उपक्रमाला बळकट करण्यासाठी असल्याचे यातून दिसून आले.
हाच विश्वास आपल्याला या वर्षी अधिक महत्त्वाकांक्षा, अधिक व्यापक प्रमाणात आणि उद्देशाच्या मजबूत भावनेसह परत एकत्र आणत आहे.
५ किमी फन रन, १० किमी, २१ किमी हाफ मॅरेथॉन आणि ४२ किमी फुल मॅरेथॉन आता खुली झाली आहे. प्रत्येक गट हा एक उत्सव, जल्लोष आहे. तुम्ही पहिल्यांदाच धावणारे असाल किंवा अनुभवी मॅरेथॉनपटू असाल, हा उपक्रम तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी, गुंतवून ठेवण्यासाठी आणि तुमची क्षमता उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे.”
वडगाव-धायरी परिसरात डायग्नोस्टिक सेंटर स्थापनेची मागणी
Newsworldmarathi Pune: वडगाव धायरी परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे महापालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखान्यामध्ये डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी माजी नगरसेवक बाळासाहेब नवले व सारंग नवले यांनी केली आहे.
या सेंटरमध्ये अत्यल्प दरात एम.आर.आय, सिटी स्कॅन, एक्स-रे यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. यासंदर्भातले निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना देण्यात आले.
नवले यांनी सांगितले की, धायरीसह परिसरातील नागरिकांना तपासणीसाठी लांब जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाच्या वैद्यकीय तपासणी सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
शंकर महादेवन यांनी गायलेले “बाप्पा मोरया” गाणं उपमुख्यमंत्री अजित पवार व उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित
Newsworldmarathi Pune: पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं “बाप्पा मोरया” हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच युवा उद्योजक श्री. पुनीतदादा बालन यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आलं.
या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल.
या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे.
“बाप्पा मोरया” या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे.
गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पुनीत बालन यांनी “बाप्पा मोरया” या गीताला शुभेच्छा दिल्या.
महिलांना आर्थिक स्वातंत्र्य हवे : ॲड वर्षा देशपांडे
Newsworldmarathi Pune: समाजामध्ये स्त्री, पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे. केवळ महिला आणि पुरुष समान असल्याचे न सांगता प्रत्यक्ष त्याबाबत जागरूकता झाली पाहिजे असे मत लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आजही गर्भलिंग निदान केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ॲड. वर्षा देशपांडे यांना नुकताच संयुक्त राष्ट्र संघातर्फे ‘युएन पॉप्युलेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या निमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ॲड. देशपांडे यांचा वार्तालाप गुरवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
शेतीसह विविध क्षेत्रात महिला काम करतात. मात्र, महिलांच्या नावावर शेती नसते. तसेच त्यांना आर्थिक अधिकार आणि मालमत्तेत त्यांचे नाव नसते. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेची केवळ घोषणा करून होणार नाही तर महिलांना आर्थिक अधिकार देणे महत्वपूर्ण आहे तरच ज्या सक्षम होतील. आर्थिक अधिकार नसल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून देशात विविध कायदे आहेत. मात्र, देशात गर्भलिंग निदान केले जात आहे. जन्मापूर्वी मुलींची हत्या केली जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. देशात दरवर्षी सहा लाख तर महाराष्ट्रात ५३ हजार महिलांची जन्मास येण्यापूर्वी हत्या होते ही बाब चिंताजनक आहे. देशात याबाबत कडक कायदे असतानाही त्याचे पालन का होत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वात पहिले गर्भलिंगनिदान विरोधी कायदा महाराष्ट्र करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. यामुळे तरुणांचे लग्न होत नसल्याचे ही वास्तव समोर येत असल्याकडे ॲड. देशपांडे यांनी लक्ष वेधले. तनिष्का डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मानाच्या पाचव्या गणपतींनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार; अखिल मंडई मंडळ व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय
Newsworldmarathi Pune: वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे.
याविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन. यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.
मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस सा.७ वा श्री ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्या मुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी.
पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

