Newsworldmarathi Pune: समाजामध्ये स्त्री, पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांप्रमाणेच आर्थिक स्वातंत्र्य मिळायला हवे. केवळ महिला आणि पुरुष समान असल्याचे न सांगता प्रत्यक्ष त्याबाबत जागरूकता झाली पाहिजे असे मत लेक लाडकी अभियान आणि दलित महिला विकास संस्थेच्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आजही गर्भलिंग निदान केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ॲड. वर्षा देशपांडे यांना नुकताच संयुक्त राष्ट्र संघातर्फे ‘युएन पॉप्युलेशन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या निमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ॲड. देशपांडे यांचा वार्तालाप गुरवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
शेतीसह विविध क्षेत्रात महिला काम करतात. मात्र, महिलांच्या नावावर शेती नसते. तसेच त्यांना आर्थिक अधिकार आणि मालमत्तेत त्यांचे नाव नसते. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेची केवळ घोषणा करून होणार नाही तर महिलांना आर्थिक अधिकार देणे महत्वपूर्ण आहे तरच ज्या सक्षम होतील. आर्थिक अधिकार नसल्याने महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून देशात विविध कायदे आहेत. मात्र, देशात गर्भलिंग निदान केले जात आहे. जन्मापूर्वी मुलींची हत्या केली जात असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. देशात दरवर्षी सहा लाख तर महाराष्ट्रात ५३ हजार महिलांची जन्मास येण्यापूर्वी हत्या होते ही बाब चिंताजनक आहे. देशात याबाबत कडक कायदे असतानाही त्याचे पालन का होत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सर्वात पहिले गर्भलिंगनिदान विरोधी कायदा महाराष्ट्र करण्यात आला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रसह देशातील विविध राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. यामुळे तरुणांचे लग्न होत नसल्याचे ही वास्तव समोर येत असल्याकडे ॲड. देशपांडे यांनी लक्ष वेधले. तनिष्का डोंगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Recent Comments