Newsworldmarathi Pune: राजस्थान प्रवासी फाउंडेशनतर्फे आयोजित “प्रवासी राजस्थान सांस्कृतिक सोहळा २०२५” मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात हजारो राजस्थानी प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थानच्या पोकरणचे आमदार महंत प्रतापपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानसिंह पीलवा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
या सोहळ्याला देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये केंद्रीय पर्यटन मंत्री गजेन्द्रसिंह शेखावत, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, मंत्री मदन दिलावर, जोराराम कुमावत, ओटाराम देवासी, आमदार नरेंद्र मेहता, दीप्ती किरण महेश्वरी, महेन्द्र काबरा, मेघराज धाकड, पूनम कुलरिया यांचा समावेश होता. तसेच पुणे समस्थ राजस्थानी संघाचे अध्यक्ष मगराज राठी, रतनसिंह तुरा, खेतसिंह मेडत्या यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे राजस्थानच्या परंपरा, वेशभूषा, लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. नृत्य, लोकगीत आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर उपस्थितांनी रंगून जाऊन आनंद लुटला. या सोहळ्याद्वारे परदेशात आणि देशाच्या विविध भागांत स्थायिक झालेल्या राजस्थानी समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी राजस्थान प्रवासी फाउंडेशनची “प्रवासी संबल योजना” सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देश-विदेशातील गरजू राजस्थानी प्रवाशांना मदत व मार्गदर्शन देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी पूनम कुलरिया यांनी तब्बल ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मान्यवरांनी फाउंडेशनच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची ग्वाही दिली. आभार प्रदर्शन फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती चारण यांनी करत सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हा सांस्कृतिक सोहळा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, राजस्थानी समाजाच्या एकात्मतेचा, सांस्कृतिक जतनाचा आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संगम ठरला.


Recent Comments